गळक्या भिंती, बंदावस्थेतील लिफ्ट आणि एसटीपी प्लांट, तुटलेल्या संरक्षक भिंती, नादुरुस्त पाण्याचे पंप आणि मलनिःसारण वाहिन्या आदी समस्यांमुळे त्रस्त असलेल्या एमएमआरडीए वसाहतीमधील प्रकल्पग्रस्तांना आता दिलासा मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केलेल्या मागणीनंतर एमएमआरडीएने मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या शेकडो इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील 576 वसाहतीमधील सुमारे 46 हजार 798 कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे.
एमएमआरडीएने 2002 सालापासून एमयूटीपी, एमयूआयपी, मिठी नदी, मेट्रो अशा विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे वसाहती बांधून पुनर्वसन केले आहे. या इमारती जुन्या झाल्याने सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीची कामे करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी अनेक वर्षांपासून करत होते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ऑगस्टला विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अणुशक्ती नगर, चेंबूर, शीव-कोळीवाड्यातील रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवून एमएमआरडीए कार्यालयावर धडक दिली होती. वारंवार मागणी करूनही इमारतीचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यास प्राधिकरण तयारी दर्शवित नव्हते.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी नुकतीच महानगर आयुक्त संजीव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे प्रकल्पबाधित इमारतींच्या समस्यांचा पाढाच वाचला. सर्वच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट प्राधिकरणानेच करावे व आलेल्या अहवालानुसार इमारतींची सर्वच कामे करावीत अशी मागणी केली. आयुक्तांनी हा मुद्दा योग्य असून सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून कामे करून देण्याचे तसेच वसाहतीमधील बंद पडलेले एसटीपी प्लांट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याचे मान्य केले.
या बैठकीला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग क्रमांक 10 चे विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका निधी शिंदे, अंजली नाईक, श्रीकांत शेटये, मोहम्मद फारुख, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, निमिष भोसले, रामदास कांबळे, महेंद्र नाकटे, अरुण हुले, अशोक माहुलकर, राजेंद्र पोळ, किरण लोहार, प्रकाश जाधव, गणेश पाटील, संजय कदम, संदीप भोईर, रजनी रमण, दक्षता पाताडे, कल्पना टिकेकर, नीलम डोळस उपस्थित होते.