
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य दीपोत्सव सुरू होत आहे. लक्ष दिव्यांच्या तेजाने लखलखणाऱया या सोहळ्याचा दिमाखदार शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार असल्याने ‘दीपोत्सवा’चे आकर्षण वाढले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे साजरा होणारा ‘दीपोत्सव’ म्हणजे मुंबईकरांसह पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो. या सोहळ्यासाठी दिग्गज नेते, कलाकारांसह सर्वसामान्य नागरिकांचीही मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी डोळे दिपवून टाकणाऱ्या रोषणाईमुळे परिसरात अक्षरशः उत्साहाचे-चैतन्याचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे मुंबईकर या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता या ‘दीपोत्सवा’चा शुभारंभ होणार आहे.
तरुणाईसाठी सेल्फी पॉइंट
दीपोत्सवानिमित्त केलेल्या रोषणाईसोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात अनेक सेल्फी पॉइंटही तयार करण्यात येणार आहेत. सोहळ्यानिमित्त आकर्षक आणि भव्य प्रवेशद्वारही उभारण्यात आले आहे.
गेल्या 13 वर्षांपासून या दिमाखदार ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र यावर्षी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे या सोहळ्याकडे मुंबईकरांसह संपूर्ण राजकीय विश्वाचेही लक्ष लागले आहे.
संस्कृतीचे दर्शन
17 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या संपूर्ण परिसरात रोषणाई केली जाणार आहे. यामध्ये आकाश कंदिलांसह दिवे, तोरणांमुळे परिसर उजळून निघणार आहे. विविधरंगी रांगोळ्या परिसराची शोभा वाढवणार आहेत.
मनसेच्या दीपोत्सवाची छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. आकाश कंदील, तोरणं आणि कमानींनी परिसर सजला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो असलेले कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.