मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना जिल्ह्यातील गाव शिवारातील मोबाईल टॉवरवर लावलेल्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई सोमवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी करून, 5 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरून नेल्याच्या घटना घडल्या. मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरणारे संभाजीनगर येथे बॅटऱ्या विक्रीसाठी घेवून निघाल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून, संतोष श्रीराम राठोड (रा.आडगांव ता. संभाजीनगर), सिराजखान अब्दुलखान (रा. फुलेनगर हार्र्सुल,संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 23 बॅटऱ्या, सेल, 7 बॅटऱ्यांचे काळ्या रंगाचे बॉक्स असा एकूण 35 हजार रूपये किंमतीचा व परिसरातील 7 बॅटऱ्या सेल व 4 पांढऱ्या रंगाचे खोके, पल्सर मोटार सायकल, शाईन मोटार सायकल, बॅटरी वाहतूक करण्यासाठी वापरेलले वाहन असा एकूण 5 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.