मुंबईत युद्धसरावाचा सायरन वाजला! पालिका, पोलिसांसह विविध दलांचे एकत्रित मॉकड्रिल

पाकिस्तानने केलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आज क्रॉस मैदानावर युद्धसरावाचा सायरन वाजला आणि मुंबई महापालिका, पोलीस, एनडीआरएफ, एनसीसीसह अनेक आपत्कालीन दलांनी एकत्रितपणे मॉकड्रिलचा सराव केला.

मुंबईच्या क्रॉस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये मुंबई महापालिका, पोलीस, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एनसीसी पॅडेट आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. लोकांना युद्धसदृश परिस्थितीत कसे वागावे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. याबाबतची माहिती महाराष्ट्र नागरी संरक्षण दलाचे पोलीस महासंचालक प्रभात पुमार आणि मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. दरम्यान, पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉकड्रिल सुरू राहणार आहे तसेच वेगवेगळय़ा विभागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभात पुमार यांनी दिली.

संवेदनशील भागांत ब्लॅकआऊट करणार

संवेदनशील ठिकाणे असलेल्या तारापूर आणि गोवंडी भागात युद्धजन्य परिस्थितीत वापरात येणारी ब्लॅकआऊट रणनीती वापरण्यात येणार आहे. याबाबत या विभागातील नागरिकांना पूर्वसूचना दिल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

लोहमार्ग पोलिसांकडूनही प्रात्यक्षिके

रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी महत्त्वाच्या स्थानकांमध्ये मॉकड्रिल केले. पूर्व उपनगरातील संवेदनशील ठिकाण असलेल्या अणुशक्तीनगर येथे पोलिसांनी काही सोसायटय़ांमधील लोकांना विश्वासात घेऊन मॉकड्रिल केले. मॉकड्रिलदरम्यान पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दूर ठेवले होते.

अभ्यासक्रमात नागरी संरक्षण दलाचा प्रशिक्षण कार्यक्रम

मध्यंतरीच्या काळात सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम कमी झाले होते. मात्र, आता नव्याने प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये नागरी संरक्षण दल आणि मुंबई विद्यापीठात करार झाला असून अभ्यासक्रमात लवकरच प्रशिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. त्यावर काम सुरू असल्याची माहिती प्रभात पुमार यांनी दिली.