मोडक सागर, तानसा तलाव ओव्हर फ्लो; चार तलाव भरले, पाणीकपातीचे संकट टळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमधील तुळशी, विहारनंतर आज एकाच दिवशी मोडक सागर आणि तानसा असे मोठे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे तलावांत एकूण 7 लाख 79 हजार 568 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत पुरणारे आहे. सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने 54 टक्के पाणी भरले आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळणार आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेकडून वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. यावेळी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र या वर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर महिनाभर ओढ दिल्याने पाणीसाठा 18 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे पालिकेने गेल्याच आठवडय़ात मुंबईत पाणीकपात करावी लागेल असा इशारा दिला होता. मात्र गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीकपात टळणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.

सर्वात मोठा भातसा तलाव 50 टक्के भरला

मुंबईला आवश्यक असलेल्या एकूण पाणीसाठय़ापैकी 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर म्हणजे 50 टक्के पाणीसाठा हा एकटय़ा भातसा तलावामधून होतो. याच तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो. सध्या या तलावात 3 लाख 68 हजार 184 दशलक्ष लिटर (51.35 टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.

तीन दिवसांत तीन महिन्याचे पाणी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांत 19 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 4 लाख 15 हजार 175 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालेला होता. मात्र अवघ्या तीन दिवसांत तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठय़ात तब्बल 3 लाख 64 हजार 393 दशलक्ष लिटर पाण्याची म्हणजेच 95 दिवसांच्या म्हणजेच तीन महिन्यांच्या साठय़ाची वाढ झाली आहे.

एकाच आठवडय़ात चार तलाव भरले

मुंबईतील पवई तलाव 12 जून रोजी दुपारी 3 वाजता भरून वाहू लागला होता. पवई तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने त्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त व्यावसायिक कामांसाठी केला जातो. भांडुप संकुल परिसरातील तुळशी तलाव हा 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तर विहार तलाव 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. ठाणे जिह्यातील मोडक सागर तलाव 22 जुलै रोजी मध्यरात्री 3.34 वाजता आणि तानसा तलाव हा 22 जुलै रोजी पहाटे 5.48 वाजता भरून वाहू लागला आहे.

तलावातील 22 जुलैचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा 9780  दशलक्ष लिटर

मोडक सागर  128925  दशलक्ष लिटर

तानसा         144593  दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा  92342   दशलक्ष लिटर

भातसा         368184  दशलक्ष लिटर

विहार          27698  दशलक्ष लिटर

तुळशी          8046  दशलक्ष लिटर

एकूण           779568  दशलक्ष लिटर