मॉडर्न पेंटॅथलॉनच्या ऍकॅडमीसाठी प्रयत्न सरु

178

जलतरण, तलवारबाजी, नेमबाजी, रनिंग आणि घोडेस्वारी या पाच खेळांचा समावेश असलेला मॉडर्न पेंटॅथलॉन हा ऑलिम्पिक खेळ हिंदुस्थानात स्थिरावू पाहतोय. नामदेव शिरगावकर यांनी या खेळाचा आपल्या देशात श्रीगणेशा केलाय. या खेळ टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. मात्र महाराष्ट्रात या पाचही खेळांचा सराव एकाच ठिकाणी होऊ शकत नाही. कारण या खेळासाठी लागणाऱया सुविधा येथे उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातील खेळाडूंना या खेळाचा सराव कोणत्याही अडचणीविना करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऍकॅडमीसाठी जागा बघितली जात आहे. इतर कुठूनही मदत मिळाल्यास नक्कीच आनंद होईल, असे मत मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया आणि मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना व्यक्त केले.

आता ऑलिम्पिक पदक हवंय

हिंदुस्थानात मॉडर्न पेंटॅथलॉन हा खेळ उशिरा आलाय. पण छोटय़ाशा कालावधीत हा खेळ झेप घेऊ लागला आहे. या खेळामध्ये पाच खेळांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्रात पुरेशा ऍकॅडमी नाहीत. तसेच या खेळांमधील खेळाडूंना नोकऱयाही मिळत नाहीत. पण याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रीजिजू यांच्याशी बोलणे झाले असून लवकरच यावरही तोडगा निघू शकेल. यावेळी या खेळामधून ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू तयार व्हावा असे मनापासून वाटते, असे सुनील पूर्णपात्रे यांनी नमूद केले.

पाच खेळांच्या
सुविधा या ठिकाणी उपलब्ध

घोडेस्वारी     :         हरयाणा

तलवारबाजी :         पुणे, हरयाणा

नेमबाज :     मुंबई, पुणे,  कोल्हापूर, नाशिक, हरयाणा, आंध्र प्रदेश

जलतरण, रनिंग        :         जवळपास सर्वच                          ठिकाणी

शालेय स्पर्धेत घवघवीत यश

महाराष्ट्राच्या मुले व मुली यांनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. संभाजीनगर, कर्नाटक, यूपी या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमधील 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत महाराष्ट्राने सुवर्ण पदक पटकावले. आता या वर्षी कोल्हापुरात राष्ट्रीय शालेय स्पर्धा होणार होती. पण कोरोनामुळे ती झालेली नाही. यापुढील राष्ट्रीय शालेय गेम्समधील 19 वर्षांखालील गटासह 17 वर्षांखालील गटामध्येही खेळाडू चमक दाखवू शकणार आहेत. कारण या गटाचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आगामी वर्षांमध्ये 14 वर्षांखालील गटाचाही राष्ट्रीय शालेय स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत खेळाडू रनिंग, स्वीमिंग आणि रनिंग या तीन प्रकारांत सर्वस्व पणाला लावतात, असे सुनील पूर्णपात्रे यावेळी म्हणाले.

 

गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारे महाराष्ट्राचे खेळाडू

अथर्व म्हात्रे, आयुषी गनात्रा, मयांक चाफेकर, प्रतीक बांग, क्रिशीराज भगत, डॉली पाटील, मुग्धा वावहळ, वैभवी देसाई, ननन्या नामदे, सायली गंजाळे, शिवतेज पवार, आर्यन पाटील, समीक्षा बीजू, शरयू फरतोडे, अहिल्या चव्हाण, सूरज बागवन, भक्ती पाटील, श्रीवल्लभ चिखलकर, सारंग आंबुलकर, अभिषेक मौर्या, मकरंद कुत्रे, निशिगंधा पोंक्षे, ऋषिकेश पाटील, राधिका महाले, मेहेक तांबट, अबीर धोंड, सुमेधा कुलकर्णी, अभिलाष गुडगुंती, अर्जुन अडकर.

खेळाडू, कोचेस, पंचांसाठी वेबिनारचे आयोजन

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राकडून ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडू, कोचेस व पंचांसाठी हा स्पेशल कार्यक्रम राबवण्यात आला. एवढेच नव्हे तर दुखापती कशा काय टाळता येऊ शकतात याबाबत फिजियोथेरेपिस्ट संदीप चौधरी यांच्याकडून मार्गदर्शन देण्यात आले, अशी माहिती सुनील पूर्णपात्रे यांच्याकडून देण्यात आली.

सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणार

मॉडर्न पेंटॅथलॉन हा खेळ सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणार होता. पण गोव्यामध्ये होणारी स्पर्धा कोरोना व लॉकडाऊनमुळे झाली नाही. पण आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज झालो होतो. पुण्यातील बालेवाडीत याचा सरावही होणार होता. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये पाच खेळांचा समावेश असतो. पण राष्ट्रीय स्पर्धेसाठी रनिंग, जलतरण, तलवारबाजी व नेमबाजी या चारच खेळांच्या स्पर्धा होणार होत्या. घोडेस्वारीला यामधून वगळण्यात आले होते. कारण घोडेस्वारीसाठी लागणाऱया सुविधा सगळीकडे उपलब्ध नसतात, असे सुनील पूर्णपात्रे सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या