
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून बांगलादेश आणि युक्रेनमधील स्थितीबद्दल चर्चा केली. विशेषतः बांगलादेशातील अल्पसंख्याक विशेषतः हिंदूंबद्दल दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली तसेच तेथे लवकरात लवकर कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यावर भर दिला पाहिजे याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांच्याशी विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेबद्दल एक्सवरून सांगितले. युक्रेनमधील सद्यस्थिती आणि विविध महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनमध्ये पुन्हा शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी हिंदुस्थानचे नेहमीच समर्थन राहील असे मोदी यांनी बायडेन यांना आश्वस्त केले. युक्रेनमधील सद्यस्थितीवर चर्चा करताना पंतप्रधानांनी युक्रेनच्या दौऱ्याबद्दलही बायडेन यांना सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय संबंध आणि दोन्ही देशांप्रति आंतरराष्ट्रीय आणि विविध मुद्दय़ांवर कटिबद्धता दर्शवली तसेच द्वीपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला.