कुकी आणि मैतेई समुदायांतील संघर्षामुळे मणिपूर गेल्या 16 महिन्यांपासून धगधगत आहे. हा रक्तरंजित प्रकार मोदी सरकारला माहीत असूनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे. मूळचे हिंदू असलेले मैतेई समाजाच्या नागरिकांना तेथे शांतता हवी आहे. परंतु सरकारच्या दुर्लक्षामुळे 16 महिन्यांनंतरही मणिपूर जळत आहे, असा आरोप मणिपूरमधील स्थानिक पत्रकारांनी केला.
‘सरहद्द’ संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मणिपूर येथील पत्रकारांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीचे वर्णन केले. यावेळी मणिपूरचे ज्येष्ठ पत्रकार ब्रॉझेन्द्रा निन्गोंम्बा, द मॉर्निंग बेलचे असोसिएट एडिटर सरोजकुमार शर्मा, टीव्ही अॅन्कर, मॅनाबाचे एक्झक्युटिव्ह एडिटर कैशाम यईफाबा यांनी मणिपूरच्या सद्यः स्थितीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते.
ब्रॉझेन्द्रा निन्गोंम्बा म्हणाले, ‘मणिपूरमधील हिंसाचार अद्यापि थांबलेला नाही. मूळचे हिंदू असलेले मैतेई समाजातील लोकांना शांतता हवी आहे. मात्र, कुकी समाजाला शांतता नको असून, त्यांची वेगळे अॅडमिनिस्ट्रेशनची मागणी आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. कुकी हे मूळचे म्यानमारचे आहेत; परंतु घुसखोरी करून मणिपूरमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. कुकी समाजाचे 10 आमदारांनीदेखील कुकी समाजासाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली असून, त्यामध्ये दोन मंत्र्यांचाही समावेश आहे.
सरोजकुमार शर्मा म्हणाले, ‘कुकी लोकांनी तयार करून घेतलेली बनावट आधार कार्ड राज्य सरकारने जप्त केली आहेत. कुकी समुदाय हे खिश्चन आहेत, मैतेई हे हिंदू आहेत. तेथील मैतेई समाजाच्या महिला, मुलांवरही कुकी समाजाकडून वारंवार अत्याचार होत आहेत. सीमावर्ती म्यानमार, चीनमार्गे कुकी समाजाला शस्त्रांचा आणि अमली पदार्थांचा पुरवठा होतो.’
कैशाम यईफाबा म्हणाले, ‘मणिपूरमधील लोकांना शांतता हवी आहे. सध्या तेथे भाजपचे सरकार आहे. केंद्र सरकारने लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मणिपूरच्या नागरिकांची केंद्र सरकारकडे मागणी आहे.’
पुण्यात वसतिगृह सुरू करणार संजय नहार
‘मणिपूरच्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. मणिपूरच्या मुलींसाठी पुण्यात वसतिगृह सुरू करण्याच्या आमचा प्रयत्न आहे. पुढील एक वर्षात मणिपूरमधील १०० मुले पुण्यात शिक्षणासाठी आणण्यासाठी आमचे प्रयत्न करणार आहेत. राज्यातील प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात मणिपूरमधील विद्यार्थ्यांसाठी एक जागा रिक्त ठेवावी, अशी मागणी आम्ही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे,’ असे संजय नहार यांनी म्हणाले.