रिझर्व्ह बँकेच्या पत्रावळीत मोदी सरकारचा द्रोण; डल्ला मारण्यासाठी आता नवी शक्कल

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेच्या पत्रावळीत आपला ‘द्रोण’ तरी असावा यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेकडे 9.63 लाख कोटी रुपयांचा राखीव निधी आहे. त्यावर मोदी सरकारचा डोळा आहे. किती राखीव निधी ठेवायचा याचे निकष बँकेने ठरवावेत आणि अतिरिक्त निधी सरकारला ट्रान्सफर करावा असे बंधन घालण्यासाठी बँकेवर मोदी सरकारचा दबाव वाढत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यात गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि चार डेप्युटी गव्हर्नर यांचा समावेश आहे. राखीव निधीबाबत नियम ठरवण्यासाठी त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. मोदी सरकारने यापूर्वी तीन वेळा रिझर्व्ह बँकेकडे तिच्या राखीव निधीमधील 3.6 लाख कोटी रुपयांची मागणी केली होती आणि शुक्रवारी सरकारने असे काही मागितलेच नाही, असे म्हटले होते. मात्र सरकारला बँकेचा राखीव निधी हवाच आहे आणि त्यासाठीच निकष ठरवण्याचा दबाव वाढत आहे, असे एका अधिकाऱयाने सांगितले.

रिझर्व्ह बँकेचा सध्याचा राखीव निधी हा सरकारी मर्यादेच्याही पुढे असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने सांगितले. एकूण दरडोई उत्पन्नाच्या 14 टक्के इतका रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी असावा असा जागतिक निकष आहे. परंतु सध्याचा राखीव निधीचा आकडा हा दरडोई उत्पन्नाच्या 27 टक्के इतका आहे आणि इतका निधी ठेवण्यासाठी कोणताही निर्णय घेतल्याचे किंवा आदेश दिल्याचे ऐकिवातही नसल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.

19 नोव्हेंबरला विशेष बैठक
राखीव निधी आणि केंद्र सरकारची मागणी यावर चर्चा करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक येत्या 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रिझर्व्ह बँकेत एक योग्य भांडवली रचना तयार करण्याबाबत त्यात चर्चा होईल असे संकेत केंद्रीय वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी नुकतेच ट्विटरवर दिले होते.

सरकारने रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतले पैसे मागितलेले नाहीत मात्र राखीव निधीसाठी निकष बनवायला सांगणे म्हणजेच अतिरिक्त निधी स्वतःकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल हे यावरून स्पष्ट होते असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. सरकारने मात्र बँकेला पाठवलेल्या पत्रामध्ये अतिरिक्त निधी ट्रान्सफर करावा असा कुठेही उल्लेख केलेला नाही असा सरकारी सूत्रांचा दावा आहे.

summary- modi govt trying to dominate rbi for its fund

आपली प्रतिक्रिया द्या