
सामना ऑनलाईन, पुणे
कोटय़वधीचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी जीएसटीच्या पुणे झोनल युनिटने पुण्यातील एका व्यापाऱ्यास मुंबईतून अटक केली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत पुण्यातून ही पहिलीच कारकाई आहे. मोदसिंग पद्मसिंह सोढा असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
युनिटला मिळालेल्या माहितीनुसार चौकशी केली असता काही व्यक्ती जीएसटी नोंदणी करून त्याआधारे बनावट बिलांद्वारे खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मोठय़ा प्रमाणात डेटाचे विश्लेषण केल्यानंतर या रॅकेटमधील काही प्रमुख व्यक्तींची नावे मिळाली होती. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी सोढा यांना अटक करण्यात आली आहे.
सोढा याने दहा बनावट कंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे 415 कोटी रुपयांचे केवळ कागदी व्यवहार केले आहे. या प्रकरणात एकूण 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. वस्तू न पुरवता देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोळ करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करून त्याद्वारे काळा पैसा निर्माण करण्यात येत असल्याची शक्यता युनिटने व्यक्त केली आहे.
युनिटने केलेल्या पहिल्याच तपासणीमध्ये या बनावट कंपन्यांकडून 2 कोटी 18 लाख रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमांतून सरकारची मोठय़ा प्रमाणात फसवणूक करण्यात येत असून अनेक कंपन्या त्यात सहभागी आहेत. अशी कामे करणारे एक मोठे रॅकेट सक्रिय असून त्याची व्याप्ती देशभर पसरली आहे, अशी माहिती युनिटकडून देण्यात आली.

























































