
त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून देशातील सर्वच राज्यांवर हिंदी लादू पाहणाऱ्या मोदी सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी झटका दिला. ‘देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा असून प्रत्येक भाषेला समान महत्त्व आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात राहत असाल तर तिथली भाषा शिका,’ असे आवाहन भागवत यांनी केले.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील सोनपैरी गावातील हिंदू संमेलनात ते बोलत होते. प्रादेशिक भाषेला दुय्यम ठरवून मोदी सरकार सर्वच राज्यांवर हिंदी भाषा लादत असल्याचा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचा आरोप आहे. त्या विरोधात सर्वत्र खदखद आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे.
मातृभाषेच्या बाबतीत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आपल्या घरात आपण मातृभाषेतच बोलले पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या राज्यात राहत असाल तर त्या राज्याची भाषा शिकून घेतली पाहिजे,’ असेही भागवत म्हणाले.
विरोधकांचा हल्ला
काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी भागवत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ‘भागवत यांच्या वक्तव्याने काही फरक पडणार नाही. त्यांनी हे सगळे भाजप नेते व कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे,’ असे अल्वी म्हणाले.





























































