
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत काही मौलवींची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणी हिंदुत्वावरून वाटाण्यासारख्या उडणाऱ्या नितेश राणेंनी राजीनामा द्यावा असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच नितेश राणेंनी मोहन भागवत यांचा ताबडतोब निषेध करावा तरच तुम्ही हिंदुत्वावादी असाल असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोहन भागवत यांनी देशातल्या मौलवींची भेट घेतली. या प्रकरणी नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. कारण ही बाब त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे. सरसंघचालक मोहन भागवत जर मुस्लिम मौलवींसोबत जर चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश राणेंनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी भाजप आणि संघाचा निषेध करावा. कारण त्यांच्या कठोर हिंदुत्ववादाच्या विचारात ते बसत नाहीत. खुर्चीला चिकटून बसू नका, धर्मासाठी, हिंदुत्वासाठी राजीनामा द्या. मोहन भागवत यांचा ताबडतोब निषेध करा तरच तुम्ही हिंदुत्वावादी. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान समाज राहतो. त्यांच्यापुढे पाकिस्तानात जाण्याचा पर्याय होता त्यांनी भारत हा आपला देश मानला. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप नव्हता. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींजींच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता. अनेक वीर मुस्लिम हे फासावर गेले. अश्फाखुल्ला खानसारखी अनेक लोक फासावर गेलेत. त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर गेल्या पाहिजेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहीर अमर शेखसारखे लोकं काम करत होते. हमीद दलवाईसारखे राज्यात समाजसुधारणेचं काम करत होते. जे वातावरण बिघडवत आहेत हे या लोकांनी समजून घेतले पाहिजे. मोहनराव भागवत यांच्या कार्याचे मी स्वागत केले आहे. राष्ट्र एक ठेवायचं असेल, राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल तर हिंदुत्वासोबत इतर लोकांना सामावून ठेवलं पाहिजे. फडणवीस आणि योगींच्या मंत्रिमंडळात जे काही लोक बसले आहेत ना त्यांना मोहन भागवतांचे हे काम मान्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. नितेश राणे यांनी ताबडतोब राजीना द्यायला पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्यावर नुसता वाटाण्यासारखा उडत असतो. त्याचे जुने फोटे बघा, नमाज पढतोय, ते आणि त्याचे वडिल रोजा सोडत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
उपराष्ट्रपतीपदासाठी आम्ही उमेदवार देणार नाही. समोरून कोण बाहुला बसवतील, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार ठरवू. इथे संख्याबळाचा नाहिये जर तु्म्ही अभ्यास केला तर कळेल की लोकसभेतही भाजपकडे पूर्ण संख्याबळ नाही. अनेक पक्षांच्या टेकूवर त्यांचे बहुमत टिकून आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.