मोहम्मद अझरुद्दीनसह तिघांचा ट्रॅव्हल कंपनीस 21 लाखांचा गंडा

mohammad azharuddin

पॅरिस आणि दुबईचे ऑनलाईन विमान तिकीट बुक करण्यास सांगून हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी ट्रॅव्हल कंपनीस तब्बल 21 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अझरुद्दीनसह तिघांविरुद्ध बुधवारी संभाजीनगर येथील सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अझरुद्दीन यांचे स्वीय सहाय्यक मुजीबखान यांनी हे आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले आहे.

लेबर कॉलनी येथे राहणारा मोहंमद शहाब मोहंमद याकूब (48) हे दानिश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत ऑनलाईन तिकीट बुकिंगचे काम करतात. 9 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांच्या मोबाईलवर मोहम्मद अझरुद्दीन (रा. विजयवाडा, हैदराबाद) याचा स्वीय सहायक मुजीब खान (रा. बेगमपुरा) याचा कॉल आला. त्याने 9 नोव्हेंबर रोजीचे मोहम्मद अझरुद्दीन यांचे सकाळचे 4.15 चे एमिरात एअरलाईन्सचे मुंबई – दुबई – पॅरिसचे ऑनलाईन तिकीट बुक करण्यास सांगितले. या तिकिटाचे पैसे तुमच्या खात्यात ऑनलाईन जमा करतो असे सांगितल्यामुळे मोहंमद शहाबने 3 लाख 61 हजार 995 रुपयांचे तिकीट काढले. त्यानंतर पुन्हा मुजीबने दुसऱ्या दिवशी कॉल करून मोहंमद शहाबला सुरेश अव्वेकाल यांचे मुंबई-दुबई-पॅरिसचे अपडाऊन तिकीट बुक करण्यास सांगितले. ते तिकीटदेखील त्याने ऑनलाईन बुक केले. 7 लाख 23 हजार रुपयांच्या तिकीट बुकिंगनंतर पैशांची विचारणा केली असता, मी आता कामामध्ये आहे, पैसे ऑनलाईन तुमच्या खात्यावर टाकतो, असे सांगितले. त्यानंतर मुजीब खान यांच्या सांगण्यावरून शहाबने पुन्हा अजयसिंग यांचे कोपनअ‍ॅगन-अ‍ॅमस्टरडम विमानाचे तिकीट बुक केले. मुजीब यानेच सांगितल्यामुळे सर्व तिकिटे बुक करण्यात आली होती. तिकीट बुक केल्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी 13 हजार 500 युरो (10 लाख 60 हजार रुपये) क्रोशिया नॅशनल बँकेतून अदा केले असल्याचे मुजीबने सांगितले. मात्र या मोहंमद शहाबने त्याच्या खात्यात पैसे आले नसल्याचे सांगितले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार असल्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्यास वेळ लागतो, असे म्हणत मुजीबने सांगितले. 9 ते 12 नोव्हेंबर 2019 दरम्यान मुजीबने दानिश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्समधून तब्बल 20 लाख 96 हजार 311 रुपयांची तिकिटे बुक केली होती. मुजीबने 21 लाख 45 हजार रुपये रकमेचा धनादेश पाठविल्याच्या मॅसेज व्हॉटसअ‍ॅपवर पाठविला. धनादेश प्राप्त न झाल्यामुळे दानिश टूर्सच्या मोहंमद शहाबने मुजीब खान यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र त्याने उत्तर देण्यास टाळटाळ केली, नंतर मोबाईल घेण्यास टाळू लागला. त्यामुळे या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच सिटीचौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुजीब खान, सुरेश अव्वेकल (रा. कनोर, केरळ), मोहम्मद अझरुद्दीन (रा. विजयवाडा, हैदराबाद) या तिघांविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धनादेश डिसेंबर मध्ये दिला: मुजीब खान
हिंदुस्थानचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना सुदेश अव्वेकल यांनी विदेशात नेले होते. त्याच्या विमानाच्या तिकीटाची रक्कम असलेला धनादेश दानिश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या चालकास सुदेश यांनी डिसेंबरमध्ये धनादेश आणून दिला होता. तो धनादेश त्यांनी बँकेत वटण्यासाठी न टाकता सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली मुजीब खान यांनी सामनाशी बोलताना सांगितले. दानिश टुर्स ट्रव्हल्सच्या चालकाने आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याचे मुजीब खान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या