फिरुनी नवी जन्मेन मी, हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज

आज माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण झाले. माझे स्वप्न पूर्ण झाले, माझ्या डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण झाले. हा माझ्यासाठी नवा जन्म आहे. तो मी डॉक्टरांमुळेच पाहू शकले असल्याची प्रतिक्रिया मोनिका मोरे हिने आज दिली.

हात प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मोनिका मोरे हिला आज परळच्या ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधताना वरील प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना तिने आपल्याला हाताचे दान करणाऱया कुटुंबांचेदेखील आभार मानले. आज त्यांच्यामुळेच हे आयुष्य आपल्याला मिळाले असल्याचे तिने यावेळी नमूद केले. यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. नीलेश सातभाई, डॉ. अमरेश बालियारसिंग आणि ग्लोबल हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विवेक तौलारिकर उपस्थित होते.

या शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, 28 ऑगस्ट या दिवशी मोनिकाकर दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. आता मोनिकाला डिस्चार्ज देण्यात येत असून तिला आता विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे मत त्यांनी यावेळी क्यक्त केले. तर डिस्चार्ज दिल्यानंतर तिला घरी काही शारिरीक व्यायाम करायला शिकवण्यात आले आहे. शिवाय, तिच्या आईलाही याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्यारोपण झाल्यानंतर मोनिकाच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून, तिला एक आठवडा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला एका स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आले होते. जिथे तिचे मनोरंजन म्हणून टीव्ही ही लावण्यात आला असल्याची माहिती यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

36 लाख रुपये खर्च
दरम्यान तब्बल 16 तास चाललेल्या या शस्त्रक्रिया आणि त्यानंतर रुग्णालयातील देखभाल यासर्वांसाठी एकूण 36 लाख रुपये खर्च आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. त्याशिवाय आता यापुढे औषध आणि इतर खर्चांसाठी महिन्याला तब्बल 15 ते 20 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली.

मदतीसाठी अनेक हात पुढे आले
मोनिका मोरेच्या मदतीसाठी आतापर्यंत अनेक हात पुढे आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च लक्षात घेता अनेकांनी मदत केली असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली. त्याशिवाय ग्लोबल हॉस्पिटलकडून यासाठी फेसबुकवर विशेष मोहीम देखील राबविण्यात आल्याची माहिती यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. विवेक तौलारिकर यांनी दिली.

संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी महत्त्वाची
हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने तिची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतरही तिला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तिला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पूर्णतः काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या केळी बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या