
रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका ट्रकमध्ये अडकलेल्या माकडाच्या पिल्लाची सुटका करत त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत आलेल्या कंटेनरमध्ये एका माकडाचे पिल्लू घाबरून बसलेले असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली. त्यानंतर निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, वन्य पशू-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, नितीन वाळिंबे यांनी तेथे धाव घेत सदर माकडाला ताब्यात घेतले. दरम्यान, प्राणिमित्रांनी याबाबतची माहिती शिरूर वन विभागाच्या नियतक्षेत्र अधिकारी वंदना चव्हाण यांना देत सदर माकडाच्या पिल्लाला निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संचालक सिकंदर शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, प्रणव गायकवाड आदींच्या उपस्थितीत नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यात आले.






























































