
यंदा हवामान विभागाने 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. असे असताना सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढता पुराचा धोका अशी टोकाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे देशात पावसाचे स्वरूप बदलले आहे.
यंदा देशात मान्सून पाऊस सुमारे 92 टक्क्यांच्या आसपास पडण्याची शक्यता आहे. हा कमी पाऊस आहे. वेधशाळेने जाहीर केलेला आकडा हा संपूर्ण देशभरात होणाऱया किंवा झालेल्या पावसाचा सरासरी आकडा असतो. प्रत्यक्षात हिंदुस्थानातील मान्सून अत्यंत विषम होत चालला आहे. काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत दुष्काळी अशी स्थिती आहे.
मोठी शहरेही असुरक्षित
गेल्या 10 वर्षांत चेन्नई, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांनी वारंवार पूरस्थिती अनुभवली आहे. यास मानवनिर्मित कारणेही तितकीच जबाबदार आहेत. अनियोजित शहरीकरण, नाले, तलाव आणि जलमार्गांवर अतिक्रमण, पूरक्षेत्रात बांधकाम, निकृष्ट जलनिःस्सारण व्यवस्था अशी कारणे आहेत. मात्र या सर्व त्रुटींना अत्यंत तीव्र पावसाची जोड मिळाली की आपत्ती अटळ ठरते, असा गेल्या 20 वर्षांचा अनुभव आहे.
अल्पकाळात तीव्र पाऊस
गेल्या दशकभरात अशा घटनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते आहे. आता पाऊस दीर्घकाळ कमी प्रमाणात न पडता अल्प कालावधीत तीव्र स्वरूपात पडतो. यामुळेच पूरस्थिती निर्माण होते. केदारनाथ येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दरवर्षी पावसाशी संबंधित किमात एक तरी आपत्ती येत आहे.
हवामान बदलाचा प्रभाव
संशोधकांनी अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढलाय की, हवामान बदलामुळे हवामानाशी संबंधित अत्यंत तीव्र किंवा टोकाच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता दोन्ही वाढत आहेत. उष्ण वातावरण अधिक आर्द्रता धारण करू शकते. परिणामी, जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो अधिक प्रमाणात आणि वेगाने पडतो.

























































