गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. १२ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बारा दिवस चालणारे अधिवेशन ३ ऑगस्ट रोजी संपणार आहे.

अधिवेशनासाठी ७३४ तारांकित ११३४ अतारांकित प्रश्न आले आहेत. यावेळी ९० टक्के प्रश्न हे ऑनलाईन आले आहेत. सुरुवातीचे दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देतील. उर्वरित दहा दिवस पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे. शुक्रवारचा दिवस हा खासगी सदस्य दिवस असतो मात्र यावेळी दिवस कमी असल्याने शुक्रवारीही पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. फॉर्मेलीन बरोबर अंमली पदार्थ, खाणबंदीचा विषय, प्रादेशिक आराखडा हे विषय यावेळी अधिवेशनात गाजणार आहे. विरोधी पक्षाने यावेळी सरकारला अडचणीत आणण्यासाठी रणनिती तयार केली आहे. काही मंत्र्यांची व्यवस्थित कोंडी करायची रणनिती विरोधी पक्षाने आखली आहे तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत विरोधी पक्षाचा सामना करण्यासंदर्भात भाजप व सरकारमधील घटक पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन केले आहे. मात्र असे असले तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.