संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत सभापती जगदीप धनखड व समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. या खडाजंगीमुळे नाराज झालेल्या सभापतींनी काही काळ आसन सोडले, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृह. त्यामुळे या गोंधळाचे गालबोट अधिवेशन संपता संपता लागून गेले. आपला टोन ठीक वाटत नाही. मी एक कलाकार आहे. मला लगेच हे समजते, असे म्हटल्यावर सभापती धनखडही चांगलेच संतापले.
मी सभापतींना उद्देशून असले काही सहन करणार नाही. तुम्ही कलाकार असा की अजून कुणी, सभागृहात डेकोरम हा पाळावाच लागेल. एका अॅक्टरला डायरेक्टर कंट्रोल करत असतो हे लक्षात ठेवा, असे म्हटल्यावर जया बच्चन अधिकच संतापल्या. त्यावर धनखड यांनाही राग अनावर झाला. अखेरीस धनखड यांनी रागाच्या भरातच आसन सोडले, तर विरोधी पक्षांनीही सभागृहातून सभात्याग केला.
अधिवेशनाचे सूप वाजले
संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार होते, मात्र नियोजित वेळापत्रकाआधीच आज या अधिवेशनाचे सूप वाजविण्यात आले. वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे सोपविण्यात आल्यानंतर तसेही संसदीय कामकाज फारसे उरले नव्हते.