
पावसाळा आणि भजी यांचं एक अनोखं नातं आहे. घराबाहेर पडणारा मस्त पाऊस, गरमागरम चहा आणि भजी म्हणजे जणु स्वर्गच. पावसाळ्यात कुरकुरीत भजी खाणं हा एक अनोखा आनंद असतो. पाऊस सुरु झाल्यावर, बाहेरुन विकत भजी आणण्यापेक्षा, आपण घरातच विविध प्रकारची भजी करु शकतो. भजींचे अनेक प्रकार आपण घरी बनवू शकतो जसे कांदा, बटाटा.. आपण भजींचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची कृती जाणून घेऊया. तुम्हालाही या पावसाळ्यात काहीतरी नवीन करून बघायचे असेल तर, हे 4 प्रकारची भजी नक्की ट्राय करा.
पालक भजी
पालक भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन , धने पावडर, लाल तिखट, ओवा, आलं लसून पेस्ट, हळद, जिरे आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी थोडं तांदळाचे पिठ घाला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि स्वच्छ धुवून चिरलेला पालक घालून सर्व मिश्रण पाणी घालून घट्टसर एकजीव करुन घ्या नंतर तेल गरम करुन त्यामध्ये पालक भजी तळून घ्या. ही गरमागरम सर्व्ह करा मुलांना नक्की आवडतील.
मिरची भजी
मिरची भजी बनवण्यासाठी पोपटी रंगाची कमी तिखट मिरची वापरली जाते.मिरची आधी मधोमध कापून त्यातील बीया काढून घ्या जेणेकरुन भजी तिखट होणार नाही. मिरची भजी बनवण्यासाठी प्रथम बाऊलमध्ये बेसन लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट, ओवा, मिठ आणि खाण्याचा सोडा आणि पाणी घालून मिश्रण घट्टसर फेटून घ्या त्यानंर मिरची व्यवस्थित बेसन मध्ये कोट करून गरम तेलात तळून घ्या. तयार आहेत तुमची कुरकुरतीत मिरची भजी.
ओव्याच्या पानांची भजी
ओव्याच्या पानं आरोग्यासाठी अगदी उपयुक्त असतात मात्र तुम्ही कधी ओव्याच्या पानांची भजी ट्राय केली आहेत का? ही भजी दोन पद्धतीने बनवली जातात. ही भजी बनवण्याठी प्रथम ओव्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. बाउलमध्ये बेसन भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, ओवा, हिंग , जिर, खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून सॉफ्ट होईपर्यंत फेटून घ्या. त्यानंतर ओव्याची पानं एक एक घेऊन बेसनात व्यवस्थित कोट करुन तळून घ्या.
दुसरी पद्धत म्हणजेच वर दिलेल्या बेसनच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि ओव्याची पानं बारीक चिरुन घाला. नंतर तेलात तळून घ्या. हि भजी मस्त कुरकुरीत होतात.
मुग भजी
कुरकुरीत मुगडाळीची भजी बनववण्यासाठी मुगाची डाळ 2 ते 3 तासासाठी भिजवून घ्या. नंतर डाळीतील पाणी पुर्णपणे काढून घ्या कारण डाळीत पाणी राहिल्यास भजी नरम होण्याची शक्यता असते.म्हणून डाळीतील पाणी पुर्ण निथरल्यानंतर मिक्सरमध्ये आलं, 3 ते 4 हिरवी मिरची तुम्ही तुम्हाला हवे तसे तिखटनुसार मिरची घालू शकता. हे मिश्रण पाणी न घालता जाड भरडं वाटून घ्या. नंतर एका भांड्यात हे मिश्रण काढून त्यामध्ये बारीत चिरलेला कांदा , कोथिंबीर, हळद , लाल तिखट, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. आणि नंतर दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा. त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यामध्ये छोटे छोटे भजी कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. आणि तळलेल्या मिरची सोबत कुरकुरीत भजी एन्जॉय करा.
































































