ऑक्टोबर उजाडल्यानंतर मान्सून काढता पाय घेईल अशी चिन्हे असतानाच मान्सूनचा मुंबई-महाराष्ट्रातील मुक्काम लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 5 ऑक्टोबरला मुंबईतून काढता पाय घेतो. यंदा तो 10 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत मुक्कामी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे संपूर्ण नवरात्रोत्सवातही पावसाचा गरबा पाहायला मिळणार आहे.
पावसाने यंदा समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे मान्सून सर्वसाधारण वेळेनुसार मुंबई-महाराष्ट्रातून माघारी परतेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण आठवडाभरापासून वातावरणात मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुपूल बदल झाला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून 5 ऑक्टोबरची सर्वसाधारण डेडलाईन ओलांडून 10 ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहू शकतो, असे हवामानतज्ञांचे मत आहे. त्यामुळे संपूर्ण नवरात्रोत्सवात मुंबईकरांना पावसाच्या सोबतीने गरबा खेळावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या अनेक भागांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. कोकणातील रायगड, ठाणे आदी जिह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर झाला आहे.
हवेतील आर्द्रतेत वाढ; मुंबईकरांची दमछाक
मुंबई शहर व उपनगरांत बुधवारी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 76 टक्क्यांपर्यंत वाढले. तसेच कमाल आणि किमान तापमानातही मोठी वाढ झाली. सांताक्रुझमध्ये कमाल 34 व किमान 28 अंश तापमान नोंद झाले. ढगाळ वातावरण, हवेतील धुरके तसेच आर्द्रता व तापमानात वाढ झाल्याने घामाघूम होण्याबरोबर मुंबईकरांची प्रचंड दमछाक झाली. दम्यासारखे आजार असलेल्या नागरिकांना याचा त्रास झाला.