विदर्भातील अतिवृष्टीत 20 हजार 854 हेक्टर शेतीचे नुकसान

मुंबई, विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात 8 व 9 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 20 हजार 854 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 29 हजार 920 शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे विधानसभेतील उत्तरावरून पुढे आले आहे.

विदर्भातील अतिवृष्टी आणि झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाद्वारे सभागृहाला माहिती दिली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. 180 घरांचे अंशतः नुकसान तर 9 घरे पूर्णतः पडली आहेत. 4 जनावरे दगावली असून 3 हजार 411 हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

पूरस्थिती आणि नुकसान

नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिह्यांत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. 7 नागरिकांचा मृत्यू, 4 जखमी आहेत. 17 मोठी व 10 लहान जनावरे मृत्युमुखी पडली. 1,927 घरांचे अंशतः नुकसान तर 40 घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. 209 गोठय़ांचे नुकसान झाले असून 715 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 20 हजार 854 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून बाधित शेतकरी संख्या 29 हजार 920 आहे. अमरावती विभागातदेखील अतिवृष्टीचा परिणाम दिसून आला.