कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱया 3 हजार 615 जणांवर आठवडाभरात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 7 लाख 65 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई 13 ते 19 सप्टेंबरदरम्यान करण्यात आली.

कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस बाजारात आलेली नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव हाच कोरोनाला रोखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. मात्र, लोकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना आखत लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने मागे घेत लोकांना त्यांची दैनंदिन कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, हे करताना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे मुंबई महानगरपालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र, तरीही काही बेपर्वा लोक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतात. त्यांना रोखण्यासाठी आणि शिस्तपालनाची आठवण करून देण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला हजार रुपयांचा दंड कमी करून गेल्या आठवडय़ापासून आता तो 200 रुपये करण्यात आला आहे. मात्र, तरीही लोकांचा बेशिस्तपणा अजून कमी झालेला नाही.

बोरिवलीकर सर्वाधिक बेशिस्त, 71 हजारांचा दंड

पालिकेने गेल्या आठवडाभरात केलेल्या कारवाईत ‘आर/मध्य’ वॉर्डमध्ये येणाऱया बोरिवलीतील रहिवासी सर्वाधिक बेफिकीर आणि बेशिस्त असल्याचे आढळले. या विभागातील 357 जणांवर कारवाई करून 71 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वात कमी कारवाई पालिकेच्या ‘टी’ विभागांत (मुलंड) विभागात झाली. मुलुंडमध्ये आठवडाभरात 30 जणांवर कारवाई झाली आणि त्यांच्याकडून 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या