
महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असल्याचे पुरावे विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले असताना सत्ताधारी शिंदे गटानेही त्यावर बोट ठेवले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एक लाखापेक्षाही जास्त बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज केला. स्थानांतरित झालेल्या आणि मृत्यू झालेल्या मतदारांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. याबाबत तक्रार देऊनही निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.
पंधरा वर्षांपूर्वी ज्यांचा मृत्यू झाला त्या अनेक व्यक्तींची नावे मतदार याद्यांमध्ये आजही आहेत. आश्चर्य म्हणजे त्यावेळी जे अधिकारी होते त्यांचीही नावे मतदार यादीत आहेत. ग्रामीण भागात राहणारे मतदारही शहरी भागातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी आपली नावे नोंदवतात. दोन्ही ठिकाणी त्यांची नावे असल्यामुळे ते दुहेरी मतदान करत असावेत, असा संशय गायकवाड यांनी व्यक्त केला.
चार हजार दुबार मतदार
जिल्हाधिकाऱ्यांना आपण चार हजार मतदारांची नावे दिली आहेत. त्या मतदारांची नावे दोन ठिकाणी मतदार यादीमध्ये आहेत. तरीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यवाही करत नाहीत, असा आरोपही गायकवाड यांनी केला.
निवडणूक आयोगाला मतदारांच्या बोगस नोंदींबाबत कळवले असता त्यांनी उलट ती नावे काढू नका, अशी भूमिका घेतली. ही अत्यंत गंभीर आणि लोकशाहीविरोधी बाब असल्याचे संजय गायकवाड म्हणाले.