मुलाचा मृतदेह बघताच आईनेही सोडले प्राण; परिसरात हळहळ व्यक्त

मुले आईच्या काळजाचा तुकडा असतात. मुलाला लागले, खरचटले तरी आईच्या डोळ्यात पाणी येते. मात्र, मुलाचा मृतदेह बघताच आईनेही प्राण सोडल्याची घटना औराद शहाजानीजवळील गावात घडली आहे.

काळजाच्या तुकड्याने जगाचा निरोप घेतल्याचे समजताच मुलाचा मृतदेह बघून आईनेही प्राण सोडले आहेत. मायलेकाच्या अशा मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

औराद येथील पंडित विरभद्रजी आर्य विद्यालयात विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून गोविंद चांदीवाले कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील लखनगाव होते. सीमावर्ती भागात असलेल्या लखनगावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

भालकी तालुक्यातल्या लखनगावमध्ये 60 वर्षीय गोविंद चांदीवाले राहत होते. त्यांचे रविवारी आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरी आणण्यात आला.

आपल्या मुलाचे निधन झाल्याचे कळताच त्यांच्या आईला धक्का बसला. मुलाचा मृतदेह बघताच त्यांनी हंबरडा फोडला आणि मुलाजवळच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर त्या दोघांवरही रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या