आई… HAPPINESS IS..!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी 

ती आरडओरडा करते.. आक्रस्ताळेपणाने थयथयाट करते.. तिचे ऐकले नाही की..! आई कशी असते.. प्रेमळ.. सोशिक.. त्यागी.. त्याच्याच जोडीने अगदी धटिंगणसुद्धा.. जरा वावगा वाटला न शब्द.. वाचायला.. प्रत्येकाने आपल्या आईचे प्रत्येक रूप जरा आठवून पाहावे.. सहज स्फुरेल हा शब्द तुम्हालासुद्धा. भाजीवाल्याशी.. वाण्याशी तिचे हिशेब अगदी चोख असतात.. जराही गणितात चुकणार नाही ती.. पण आपल्याला जेवायला वाढायला, आपला रोजचा डबा भरून देताना बहुदा ती गणितच विसरते.. एका पोळीच्या रोलच्या जागी तीन पोळ्यांचे रोल असतात. भात अगदी भरपूर कालवलेला असतो.. वरून तुपाची धार सोडून.. या उपर एक मौज सांगू.. कधी आपल्या आईच्या ताटात तिने कालवलेला घास खाऊन पाहिलाय..? बघा आज तिच्या ताटातील तिने कालवलेला घास तिच्याच हातून खाऊन.. स्वर्गीय आनंद मिळेल..

आई.. असे म्हणतात, देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने माय निर्मिली.. पण खुद्द देवालाही आईच्या या बहुरंगी मायेची भुरळ पडलेली आहे.. म्हणूनच अगदी हौसेने मनुष्य जन्म घेऊन त्याने हे आईच्या पदारातील पोर असण्याचे सुख अगदी मन:पूत अनुभवले आहे.. तो यशोदा आईचा कान्हा आहे.. देवकीचा पान्हा आहे.. स्वयंसिद्धा गौराईचा बाळ आहे.. आदिमायेने तर आपले स्वत्व आणि विज्ञानत्व अगदी सहज सिद्ध केले आहे.. आपल्या त्वचेच्या पेशीपासून गणेशाला जन्म देऊन.. तो दहा दिवसांचा पाहुणा होऊन पृथ्वीतलावर अवतरतो, आणि त्याच्या ओढीने तीही माहेरवाशीण म्हणून आपला पाहुणचार अगदी आवडीने स्वीकारते.. प्रत्येक घराशी तादात्म्य घेऊन.. त्या घरातील रीती परंपरांचा मान राखून.. कारण.. खरे कारण असते.. लेकाशिवाय तिला करमतच नसते.. बहुतांश घरातून त्याला कडेवर घेऊनच प्रस्थान करते ती हिमवानाकडे..

आई होणे हाच एक मोठा सोहळा असतो.. अगदी त्या दोघांपुरताच.. म्हणजे आई आणि तिच्या बाळापुरता.. खूप खूप खाजगी असा आनंदसोहळा.. ते दोघेही एकमेकांना जन्म देत असतात. आणि खरेच सांगते तो अत्यंत मौल्यवान क्षण फक्त आणि फक्त त्या दोघांचा असतो.. तिचे स्वत:चे बाळ.. कोणत्याही चौकटीचे मोजमाप लावू शकत नाही असे हे नाते. जेव्हा तिचे बाळ तिच्याकडे येते तेव्हा ती फक्त त्याची आई असते.. बाकी कोणाची कोण असण्याची तिला गरज नसते.. ना तिला.. ना तिच्या बाळाला! कोणत्याही सामाजिक परिमाणाची गरजच नसते या सर्वांगसुंदर नात्याला.. हे मातृत्व केवळ तिच्या पोटातूनच येते का..? काहींची बाळे आईच्या मनातून उमललेली असतात.. अगदी निष्पाप फुलागत.. या बाळांशी तर तिचे नाते खूपच वेगळे असते.. अगदी दैवी.. blessed. कारण ही सगळी बाळे देवाच्या घरून उमललेली असतात तिच्या मनात.. त्यांना देव कोणत्याही रुपात पाठवतो.. फक्त एकमेकांची ओळख एकमेकांना उमगायला हवी.. मग ते जग केवळ त्या दोघांचे असते.. सुंदर.. छान.. अत्यंत पवित्र.. खूप गंमत जंमत असते.. या दोघांच्याच जगात.. खाऊ असतो.. गप्पा असतात.. हितगुज असतं.. मनीचे सूर असतात..लोभस रुसवे असतात..क्षणात विरून जाणारी भांडणे असतात..धम्मक लाडू..चापट पोळी सारे सारे असते..आईची वाट पाहणे असते..बाळाची साथ असते.. सायीचा हात असतो.. फक्त तो सायीचा स्पर्श जाणवायला हवा मनाला..

जशी ओढ आईला लेकाची असते.. तशी लेकरांनाही आईची असतेच की.. आई हवीच असते.. मनातले बोलायला.. हक्काने रुसायला.. भरपूर लाड करून घ्यायला.. चुकले की कुशीत शिरायला.. हे असे एकच ठिकाण असते.. जिथे माफी न मागताच मिळते.. एका चित्रपटात खूप तरल संवाद आहे आई मुलामधला.. स्मृतीभ्रंश झाल्याने आई आपल्या मुलाला ओळखत नसते. पण ओढ मात्र केवळ मुलांचीच असते. स्वत:च्याच मुलाला ती सांगते.. “मेरे बच्चे बहुत छोटे है. इतने छोटे बच्चे मा के बगैर रह नही सकते..” त्यावर मुलगा इतके छान उत्तर देतो.. “ किसी भी उमर के बच्चे मा के बगैर  रह नही सकते..”