लहान भावंडांना मारले म्हणून पोटच्या मुलीची केली हत्या; आईनेच घातला डोक्यात वरवंटा, नालासोपाऱ्यातील घटना

crime news new

लहान भावंडांना मारते म्हणून संतप्त झालेल्या आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात घडली. कुमकुम प्रजापती असे या निर्दयी मातेचे नाव असून तिने डोक्यात वरवंटा घालून आपल्या १५ वर्षांच्या मुलीला संपवले आहे. अंबिका प्रजापती असे मृत मुलीचे नाव आहे.

नालासोपारामधील भुवन परिसरातील तांडा पाडा येथील विद्या विकासिनी चाळीत प्रजापती कुटुंब राहते. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आई कुमकुम प्रजापती हिने मुलगी अंबिका प्रजापती हिची निघृण हत्या केली. अंबिका ही पाच भावंडामध्ये सर्वात मोठी आहे. या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आई कुमकुमला अटक केली. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू असून तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रक्रिया मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रृंगी यांनी दिली आहे.

जागीच जीव सोडला

अंबिका ही आपल्या लहान भावंडांना मारहाण करत होती. याला आई कुमकुम हिचा विरोध होता. शनिवारी पुन्हा अंबिकाने भावंडांना मारहाण केली. याचा राग अनावर झाल्याने आईने अंबिकाच्या डोक्यात वरवंटा घातला. डोक्याला गंभीर जखम झाल्याने अंबिकाने जागीच जीव सोडला. भावंडांना मारहाण करण्यावरून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुळींज पोलिसांनी पंचमाना करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.