भुकेने व्याकुळ मुलाची आईनेच केली गळा दाबून हत्या

110

सामना ऑनलाईन । कनौज

आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला आपण दूधही पाजू शकत नाही हे दुःख त्या माऊलीसाठी किती मोठे असेल याची कल्पना देणारी घटना छिबरामऊ येथे घडली. सलग तीन दिवसांपासून भुकेलेल्या असलेल्या आपल्याच पोटच्या गोळ्याला येथील एका आईने गळा दाबून संपवून टाकले. ‘सकाळी आईने भावाचा गळा दाबून त्याला शांत केलं’ अशा केविलवाण्या शब्दांत जेव्हा ही घटना या महिलेच्याच अडीच वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितली तेव्हा पोलीसही काही काळ सुन्न झाले. सदर महिलेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. आता प्रशासन तिला काय शिक्षा देते त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

छिबरामऊ शहराच्या बिरतिया भागात राहणाऱ्या शाहीद ऊर्फ शालू याची आर्थिक स्थिती चांगली नाही. काम शोधण्यासाठी तो मुंबईला गेला आहे. घरी त्याची पत्नी रुखसार आपल्या तीन मुलांसोबत राहते. तिचे आठ महिन्यांचे बाळ अहद तीन दिवसांपासून भुकेलेले होते. बरेच प्रयत्न करूनही रुखसार बाळासाठी दुधाची व्यवस्था करू शकत नव्हती. तीनही मुले आईकडे खायला मागत होती. त्यात गेल्या रात्रीपासून अहद दुधासाठी रडत होता. रात्रभर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करणारी रुखसार अहदची वेदना सहन करू शकत नव्हती. अखेर स्वतःवरच संतापलेल्या रुखसारने कोवळ्या अहदचा गळा दाबून त्याचे रडणे कायमचे थांबवले.

शुक्रवारी सकाळी मुलाच्या हत्येनंतर त्याच्या जवळच ती सुन्न होऊन बसली होती. बराच वेळ अहदची हालचाल नाही असे पाहून शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर रुखसारने संतापून त्यांना रोखले. ‘मुलांची भूक भागवायला कुणी आले नाही, आता गर्दी का करत आहात?’ असा संताप तिने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या