माता न तू वैरिणी! अपशकुनी समजून मातेकडून सात महिन्यांच्या मुलीचा खून

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

घरात जन्मलेल्या अपशकुनी मुलीमुळे कुटुंबात समस्या निर्माण होत असल्याच्या अंधश्रद्धेपायी एका आईने स्वतःच्या तान्हुलीला ठार मारलं आहे. नवी दिल्ली येथे २० ऑगस्ट रोजी ही घटना घडली. अदिबा असं या क्रूर मातेचं नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली येथील मूलचंद रुग्णालयात २० ऑगस्ट रोजी अदिबा हिने आपल्या ७ महिन्यांच्या मुलीला दाखल केलं. तिच्यासोबत तिचा पतीही तेव्हा उपस्थित होता. ही तान्हुली बेशुद्धावस्थेत होती. रुग्णालयात पोहोचताच ती मृत असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. संशयास्पद मृत्यू असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं. घरातील बादलीत बुडल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचं कारण अदिबाने पोलिसांना सांगितलं. मात्र, मुलीच्या गळ्यावर खुणा असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तिच्या गळ्यावर दाब पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं. तसंच अदिबाच्या सांगण्याप्रमाणे मुलगी पाण्यात बुडलेली सापडली होती. मात्र तिच्या फुफ्फुसांमध्ये पाण्याचा अंशही नव्हता. याखेरीज या घटनेची एकमेव साक्षीदारही स्वतः अदिबा होती. त्यामुळे तिच्यावर संशय येऊन पोलिसांनी अदिबाची कठोर चौकशी करायला सुरुवात केली. या चौकशीत तिने आपणच मुलीला मारल्याचं कबूल केलं.

अदिबाने घरी कुणाही नसताना आपल्या ओढणीने मुलीचा गळा आवळला आणि बुडून मृत्यू झाल्याचं दाखवण्यासाठी तिने मुलीला बादलीत ठेवलं. अपघात दाखवण्यासाठी तिने मुलीला काही वेळाने बादलीतून बाहेर काढलं आणि पलंगावर ठेवलं. मग ती आपल्या नवऱ्याच्या दुकानात या घटनेची माहिती देण्यासाठी निघून गेली. तिच्या याच कृत्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. आपली मुलगी अपशकुनी आहे, तिच्यामुळेच घरात वैद्यकीय समस्या उद्भवल्या आहेत आणि आर्थिक नुकसान होत आहे, अशा अंधश्रद्धेपोटी अदिबाने तिचा बळी घेतल्याचं पोलिसांकडे कबूल केलं.

आपली प्रतिक्रिया द्या