जन्मदात्या मातेने दोन चिमुकलींना हौदात बुडवून मारले

28

सामना प्रतिनिधी । बीड

जन्मदात्या आईनेच २ मुलींना घरातील पाण्याच्या हौदात बुडवून मारून टाकल्याची खळबळजनक घटना शहरातील नरसोबा नगर भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घरातील पती पत्नीचा वाद व पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने तणावातून या महिलेने हे कृत्य असल्याचे म्हटले जात आहे. दीपाली शाधेश्याम आमटे (वय २३) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

दीपाली आमटे आणि राधेश्याम आमटे हे नरसोबानगर भागात राहतात. सोमवारी घरातील सर्व लोक बाहेर गेले होते. तर राधेश्याम रिक्षा घेवून बाहेर गेला होता. राधेश्याम रात्री घरी आल्यावर त्याला पत्नी व मुली दिसल्या नाहीत. त्याने सर्वत्र पत्नी व मुलींचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यामुळे राधेश्यामने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि घरी आला. मंगळवारी आंघोळीसाठी हौदातून पाणी काढत असताना राधेश्यामला मुलींचे मृतदेह पाण्याच्या हौदात दिसले. याची माहिती त्याने शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.

सोमवारी दुपारी घरी कोणीच नसल्याने दीपालीने आपल्या दोन्ही मुलींना घरातील पाण्याच्या मोठ्या हौदात टाकून दिले. त्यानंतर ती गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथे माहेरी निघून गेली. पतीने मला मारहाण करुन मुलींना हौदात टाकले, असा बनाव तिने माहेरी केला, असे पोलिसांनी सांगितले. पती चारित्र्यावर संशय घेत सतत भांडण करतो, म्हणून रागातून दीपालीने हा प्रकार केला. तिन्ही मुली असल्यामुळे दीपालीने दोन मुलींना मारले असेल का? याचादेखील तपास पोलीस करत आहेत. राधेश्याम आमटे याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या