
सामना ऑनलाईन, मुंबई
रेड सिग्नल ओलांडल्याच्या घटनांमध्ये थेट नोकरीवरून काढण्याच्या कठोर शिक्षेविरोधात मध्य रेल्वेवर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ओव्हरटाईम न करण्याचे आंदोलन पुकारल्याने शुक्रवारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनाने मध्य रेल्वेच्या दोनशेहून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर ठोस आश्वासनानंतर १२ तासांहून अधिक काळ चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले.
मध्य रेल्वेच्या मोटरमनचा संप मागे, प्रवाशांचे हाल मात्र कायम
मध्य रेल्वेवर मोटरमनकडून लाल सिग्नल ओलांडल्यास थेट नोकरीतून काढण्यासारखी कठोर शिक्षा केली जाते. मध्य रेल्वेवर ६७१ मोटरमन सेवेत आहेत. तसेच २२९ पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे मोटरमनना ओव्हरटाईम करावा लागत असून पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे वाढत्या फेऱ्यांच्या संख्येमुळे आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्याने मानसिक तणावाखाली केव्हातरी असे प्रकार घडत असल्याने त्यासाठी एवढी कठोर शिक्षा देऊ नये असे मोटरमनच्या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी पहाटेपासूनच नियमानुसार काम आंदोलन केल्याने दीडशेहून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळी पिकअवरमध्ये याचा फटका फारसा बसला नसला तरी दुपारनंतर अनेक लोकल फेऱ्यांना रद्द करण्यात आल्याने लोकल ट्रेनची गर्दी प्रचंड वाढली. मस्जिद बंदर आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांच्या दरम्यान लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांना ट्रकमधून चालत नजीकचे स्थानक गाठावे लागले.
आंदोलनास रेल कामगार सेनेचा पाठिंबा
मध्य रेल्वे सेंट्रल मजदूर संघ, रेल कामगार सेना, ऑल इंडिया एस.सी, एस.टी., मोटरमन असोसिएशन आणि ऑल इंडिया ओबीसी या सर्व संघटनांनी ‘जॉईंट ऍक्शन फोरम’च्या नेतृत्वाखाली हे मोटरमनचे आंदोलन करण्यात आले. ‘रिमुव्हल फ्रॉम सर्व्हीस’ आणि ‘कम्पलसरी रिटायरमेंट’ अशा कठोर शिक्षा मोटरमनना देऊ नयेत, रेड सिग्नल ओलांडल्यास प्रत्येक केसची तीक्रता लक्षात घेऊन योग्य शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी ‘जॉईंट ऍक्शन फोरम’ने यावेळी केली. यावेळी रेल्वे प्रशासनाशी झालेल्या चर्चेत रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, सीआरएमसचे अध्यक्ष भटनागर, एस.सी., एसटीचे थोरात आणि नरेंद्र एस.तळेकर, नितीन कांबळे, योगेश जाधव, अनिल यादव, नरेंद्र शिंदे, भावसार, ए.के.दूबे, विवेक श्रीवास्तव, गौतम कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.























































