अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? सीसीटीव्ही फुटेज जारी करा! खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अजूनही संशय व्यक्त केला जात आहे. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? अशीही शंका घेतली जात आहे. त्यामुळे अजितदादा घराबाहेर पडल्यापासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

अजितदादांसह विमानात 6 लोक होते असे सांगितले जाते. मग दुर्घटनास्थळी 5 मृतदेहच का सापडले? विमान कोसळताच अनेक स्पह्ट झाले, मग त्या विमानात बॉम्ब होता का? विमान वर हवेतच ब्लास्ट का झाले? हेसुध्दा चौकशीत शोधून काढले पाहिजे. विमानाच्या पायलटबाबत जास्त काही बोललेच जात नाही, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

प्रत्यक्षदर्शी पुरावा द्या! – मिटकरी

अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात होता असा सुरुवातीपासूनच आरोप करणारे आमदार अमोल मिटकरी यांनीही, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून अजितदादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंतचे प्रत्यक्षदर्शी पुरावे सादर करा, अशी मागणी नागरी उड्डाण महासंचालकांकडे केली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची थातुरमातुर चौकशी करून अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला असे अहवाल सांगेल आणि जनता मान्य करेल, पण महाराष्ट्र पुरावा मागतोय, असे मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सीआयडीकडून दादांच्या पीएची चौकशी

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडीमार्फतही चौकशी केली जात आहे. सीआयडीने अजितदादांच्या खासगी सचिवांची (पीए) चौकशी केली. दादांच्या बारामती दौऱयाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. 28 जानेवारीला अजितदादांच्या दौऱयाचा नेमका काय कार्यक्रम होता? रस्तामार्गे बारामतीला जायचे ठरवल्यानंतरही त्यांनी अचानक विमानाने जायचा निर्णय का घेतला? त्यापूर्वी त्यांनी त्यासंदर्भात काही चर्चा केली होती का? विमान प्रवासाचे नियोजन पुणी केले होते? दादांची झेड सुरक्षा त्यावेळी काय करत होती? दादांसोबत आणखी पुणी विमानातून जाणार होते का? याबाबत सीआयडीने दादांच्या पीएंना प्रश्न विचारल्याचे समजते.