काँग्रेसने संपूर्ण कर्जमाफी केलीच नाही, बड्या नेत्यानेच केली पोलखोल

1236
farmer-loan

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत राहतो. निवडणूक प्रचाराच्या काळात सरकार आल्यास कर्जमाफी करू असे आश्वासन मध्य प्रदेशातील जनतेला काँग्रेसकडून देण्यात आले होते. तसेच सत्ता आल्यानंतर कमलनाथ सरकारने कर्जमाफी करत असल्याची घोषणा ही केली होती. मात्र प्रचारात सांगितलेल्या 2 लाख इतक्या रक्कमेपेक्षा कमी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसच्याच बड्या नेत्याने करत घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रद्रेशातील एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली नसल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशात सरकार आल्यास 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करू असे आम्ही म्हटले होते. मात्र आतापर्यंत फक्त 50,000 रुपयांचेच कर्ज माफ करण्यात आले आहे, असे म्हणत सिंधिया यांनी कमलनाथ सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केलेच पाहिजे असेही त्यांनी ठासून सांगितले.

सिंधिया आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात राजकीय रस्सीखेच सुरू असते. मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार यावरून देखील दोघांमध्ये वाद होता. पक्षांतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर देखील आहे. त्यामुळे सिंधिया यांनी भाषणातून केवळ शेतकऱ्यांची व्यथा मांडली असे नसून मुख्यमंत्री कमलनाथ यांना देखील इशारा दिला असल्याची चर्चा आता रंगली आहे. मध्य प्रदेशात तरुण उमेदवार मुख्यमंत्री म्हणून द्यावा असा आग्रह धरणारा एक गट होता. ज्यांनी सिंधिया यांना आपला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिंधिया यांना डावलून राज्याचे मुख्यमंत्रीपद हे कमलनाथ यांच्याच हाती दिले. त्यामुळे सिंधिया समर्थक नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या