उमेदवाराच्या प्रचारापेक्षा लोकांच्या आरोग्याचा अधिकार मोठा, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची निवडणूक प्रचार रॅलीवर तीव्र नाराजी

मध्य प्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या प्रचारात कोरोनाच्या नियमाची ऐशीतैशी होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवारांना प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण प्रचारापेक्षाही लोकांच्या आरोग्याचा अधिकार मोठा असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयाने भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मध्यप्रदेशातील 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यानिमित्ताने भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धूरळा उडवला आहे. मात्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांची या प्रचारात सर्रास पायमल्ली करण्यात येत आहे. प्रचंड गर्दीच्या सभा घेऊ नयेत, प्रचार करताना मोजकेच कार्यकर्ते सोबत असावेत असा दंडक निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी आयोगाची नियमावली धाब्यावर बसवली आहे. या विरोधात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना चांगलेच फैलावर घेतले. घटनेने उमेदवार व मतदार या दोघांच्या अधिकारांची स्वतंत्र व्याख्या केली आहे. उमेदवाराला प्रचाराचा अधिकार आहे तर लोकांना जगण्याचा व निरोगी राहण्याचा अधिकार आहे असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयाने प्रचारापेक्षा लोकांच्या आरोग्याचा अधिकार मोठा असल्याचे म्हटले.

मोठय़ा जाहीर सभा घेणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आपली प्रतिक्रिया द्या