सुजय विखे-पाटील यांच्यासह राज्यातील 33 लोकसभा मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. खासदार मेधा कुलकर्णी या सुजय विखे-पाटील यांच्या पराभवाचा अहवाल भाजप प्रदेशाध्यक्षाला सादर करणार आहेत.
भाजपने 28 जागा लढविल्या. प्रदेश भाजपने मिंधे आणि अजित पवार गटाच्या वाटय़ाला गेलेल्या मतदारसंघांमधील जय-पराजयाची कारणे शोधून काढण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठीच 33 मतदारसंघांसाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सर्वांना 22 जूनच्या आत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विखेंच्या पराभवाचे होणार चिंतन
नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाला. विखे यांच्या पराभवाची खासदार मेधा कुलकर्णी चौकशी करणार आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत पराभवाच्या कारणांचा शोध कुलकर्णी घेणार आहेत. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर नांदेडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.