ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी – खासदार संभाजीराजे

486

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. विजयदुर्ग किल्याच्या पहाणीवेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. फक्त पत्रे देऊन अशा किल्ल्यांचे जतन होणार नाही. त्यासाठी शासन आणि पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर अन्य किल्ल्यांचेही प्राधिकरणामार्फत संवर्धन होण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण विजयदुर्ग किल्ल्याची, तटबंदीची, कोसळलेल्या भागाची पाहणी करून ऐतिहासिक तलाव, भवानीमाता मंदिर, राजमहाल, कोठार, गोड्या पाण्याची विहीर, जीबीचा दरवाजा या ठिकाणांची पहाणी केली. किल्ल्यांचे संवर्धन करणे त्यांचे जतन करणे काळाची गरज आहे. यात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात विजयदुर्ग ग्रामपंचायत, गाबित समाज यांच्या वतीने खासदार संभाजी राजे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. विजयदुर्ग किल्ल्याचे जतन व संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आ.वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, उपसरपंच महेश बिडये,विभाग प्रमुख संदीप डोळकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या