सिंधुदुर्गचा निसर्ग कायम सुरक्षितच पाहिजे; मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन विनायक राऊत यांचा पाहणी दौरा

755

निसर्ग चक्रीवादळ सुदैवाने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धडकले नाही. मात्र, सिंधुदुर्गचा निसर्ग कायमच सुरक्षित राहिला पाहिजे. त्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मालवण तालुका किनारपट्टी पाहणीदरम्यान देवबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारणीसाठी आपण व आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मोठमोठे दगड टाकून योग्य पद्धतीने काम सुरू आहे. टप्याटप्याने ही कामे पूर्ण होतील, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी सकाळी तहसीलदार अजय पाटणे, पतन अधिकारी शंभूराज बोथीकर, बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर, विजवितरण अधिकारी यांच्यासह मालवण वायरी, तारकर्ली, देवबाग यासह आचरा किनारपट्टीची पाहणी केली. पावसाळ्यात किनारपट्टी भागात उद्भवणार्‍या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली. देवबाग समुद्रकिनार्‍याची पावसाळ्यात होणारी धूप थांबविण्यासाठी जिओ ट्यूब बसविण्यात आल्या आहेत. यातील काही जिओ ट्यूबची कव्हर फाटली असून त्या तत्काळ बदलण्याची कार्यवाही करण्यात यावी. कामात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. जिओ ट्यूबची आयआयटीकडून तपासणी करण्यात यावी, असे आदेश पतन विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. जोपर्यंत जिओ ट्यूब बदलण्यात येत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशा सूचना त्यांनी पतनच्या अधिकार्‍यांना दिल्या. देवबाग किनारपट्टी भागातील स्थानिक ग्रामस्थांना चांगल्या दर्जाचा दगड वापरून बंधारा बांधण्याची मागणी होती. त्यानुसारच कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार बंधार्‍याचे काम सुरू आहे. जिओ ट्यूब हा चांगला पर्याय आहे. पावसाळ्यात तारकर्ली, देवबागसह किनारपट्टी सुरक्षित राहावी यासाठी आमदार नाईक यांच्यासह आपले प्रयत्न सुरू असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

किनारपट्टी भागातील वीजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात याव्यात अशी मागणी आपल्यासह पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे केली आहे. ही मागणी शासनाकडून मान्य करून घेतली जाईल. किनारपट्टी भागातील गावे यात प्राधान्याने घेतली जातील असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. मालवणातील वीज उपकेंद्र सुरू होण्यात आचरा येथील अडचण आमदार नाईक यांनी दूर केली आहे. कुंभारमाठ येथील कनेक्टिव्हीटी तयार झाली आहे. नगराध्यक्षांच्या म्हणणे आहे की शहराचा वीजपुरवठा सुरळीत, विनाखंडीत सुरू व्हावा. 33 केव्हीचे उपकेंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार येत्या दहा दिवसात ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास शहरास चांगल्या प्रमाणात वीजपुरवठा होईल. पालिका क्षेत्रात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असेही खासदार राऊत आणि आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. एलईडीच्या मासेमारीबाबत नव्या मत्स्य धोरणात एलईडीचा वापर करणार्‍यांना सक्त मजुरीची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे मागील अधिवेशन आटोपते घ्यावे लागल्याने हे बिल घेता आले नाही. परंतु नव्या मत्स्य धोरणानुसार एलईडीवर कडक निर्बंध असतील आणि याची अंमलबजावणी करणारी नौदल ही नोडल एजन्सी असणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, संमेश परब, किसन मांजरेकर, भगवान लुडबे, मनोज लुडबे, मधुरा चोपडेकर, राजू मेस्त्री, मनोज खोबरेकर, प्रवीण रेवंडकर, घनश्याम ढोके, संदेश तळगावकर, मकरंद चोपडेकर, अनिल केळुस्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या