
आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी अमेरिका ओळखली जाते. या शस्त्रास्त्रांची किंमतही भली मोठी असते. यापैकीच अमेरिकन नौदलाचे सर्वात महागड्या मानवरहित वाहनांपैकी एक ‘MQ-4C ट्रायटन’ हे पाळत ठेवणारे ड्रोन होर्मुझच्या सामुद्रधुनीवर बेपत्ता झाले आहे.
उड्डाणादरम्यान हे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पोहोचल्यावर त्याने इमर्जन्सी अॅलर्ट दिला आणि काही वेळातच ड्रोन बेपत्ता झाले.
इंग्रजी वृत्तानुसार, या ड्रोनने पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचे सुमारे तीन तासचे निरीक्षण पूर्ण केले होते आणि ते इटलीतील ‘नेव्हल एअर स्टेशन सिगोनेला’ येथील तळावर परतत असल्याचे दिसत होते.
ऑनलाइन फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘फ्लाइटराडार २४’ नुसार, या ड्रोनने इराणच्या दिशेने थोडे वळण घेतले आणि त्याच वेळी ७७०० हा कोड पाठवून खाली उतरण्यास सुरुवात केली. आणीबाणीची स्थिती दर्शवण्यासाठी ७७०० हा कोड वापरला जातो.
हे ड्रोन वेगाने भूपृष्ठाच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर ते गायब झाले. हे ड्रोन कोसळले की पाडण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्यानंतर आणि इराणने जहाजांच्या वाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास संमती दिली होती. इस्रायलच्या लेबनॉन वरील हल्ल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली आहे.
MQ-4C ट्रायटन बद्दल माहिती
२० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त किंमत असलेले MQ-4C ट्रायटन ड्रोन आखाती प्रदेशातील अमेरिकन सेंट्रल कमांडच्या कार्यक्षेत्रात तैनात करण्यात आले होते. पारंपारिक विमानांच्या तुलनेत ट्रायटन मोक्याच्या सागरी मार्गांवर अधिककाळ करडी नजर ठेवते. हे विमान मोठ्या प्रमाणावरील सागरी निरीक्षणासाठी तयार करण्यात आले असून ते अनेकदा ‘P-8A पोसायडन’ गस्ती विमानांसाठी डोळ्यांसारखे काम करते. ट्रायटन हे एकमेव स्वायत्त, अधिक उंचीवर आणि दीर्घकाळ टिकणारे सागरी विमान आहे.
हे ड्रोन ५०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर २४ तासांहून अधिक काळ उडू शकते आणि ते ७,४०० नॉटिकल मैल इतका प्रवास करू शकते. वृत्तानुसार, २०२५ पर्यंत अमेरिकन नौदलाकडे २० ‘MQ-4C ट्रायटन’ ड्रोन होती आणि आणखी सात ड्रोन खरेदी करण्याची त्यांची योजना होती.
अमेरिकेच्या इराण युद्धाचा खर्च
अमेरिका या युद्धात कथितरित्या दर सेकंदाला जवळपास १०,३०० डॉलर्स (सुमारे ९.८ लाख रुपये) खर्च करत आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) च्या आकडेवारीनुसार, दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांवर सर्वाधिक खर्च होत असून तो दररोज अंदाजे ३२० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३,०४० कोटी रुपये) किंवा एकूण खर्चाच्या ३६% आहे. हवाई कारवायांचा खर्च दररोज सुमारे २,३२७.५ कोटी रुपये म्हणजेच दैनंदिन खर्चाच्या २७.५% इतका अंदाजित आहे, तर नौदल कारवायांवर दररोज सुमारे १,४७२.५ कोटी रुपये खर्च होतात. क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा जसे की थाड (THAAD), पॅट्रियट बॅटरी आणि एजिस बीएमडी इंटरसेप्ट्सवर दररोज सुमारे ९०२.५ कोटी रुपये किंवा १०.७% खर्च होतो. गुप्तचर आणि सायबर कारवायांवर दररोज अंदाजे ४२७.५ कोटी रुपये आणि कर्मचारी व रसद पुरवठ्यावर दररोज सुमारे २८५ कोटी रुपये खर्च होत आहेत.


























































