
कलेच्या प्रांतात आपल्या ’रिऑलिस्टिक’ (वास्तववादी) शैलीने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱया सुप्रसिद्ध चित्रकार मृदुला जयराज चुरी यांच्या पहिल्या सोलो चित्रप्रदर्शनाचे मुंबईत दिमाखात आयोजन करण्यात आले होते. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या ’कलादालन’ मध्ये पार पडलेल्या या प्रदर्शनाने कलाप्रेमींची मने जिंकली. ’हामी अर्थ आर्ट फेस्टिव्हल’ अंतर्गत आयोजित या प्रदर्शनात मृदुला चुरी यांनी साकारलेल्या अनेक दिग्गज व्यक्तींच्या वास्तववादी पोर्ट्रेट्सचा समावेश होता. या प्रदर्शनाचे नेटके क्युरेशन पार्श्वगायक आणि ‘हामी अर्थ’चे संस्थापक हृषिकेश जयराज चुरी यांनी केले होते. कलेला एक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात मुंबईतील चित्रकार, विद्यार्थी आणि कलाप्रेमींनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

























































