धोनीचे फार्महाऊस बनले नंदनवन, भाजी, दूध उत्पादनांची जोमात विक्री

चौकार-षटकारांची फटकेबाजी करणाऱ्य़ा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने शेतीच्या धावपट्टीवरही तुफान फलंदाजी केली आहे. त्याच्या फार्महाऊसवर भाज्यांच्या लागवडीमुळे जणू नंदनवनच फुलले आहे. त्याच्या शेतातील भाज्या तसेच डेअरीतील दुधाच्या उत्पादनांची सध्या जोमात विक्री सुरू आहे. धोनीने अवघ्या तीन वर्षांत शेतामध्ये जणू सोने पिकवण्याची किमया केली आहे.

धोनी सध्या कुटुंबियांसमवेत दुबईत आहे. त्याने तीन वर्षांपूर्वी धुर्वा येथील सेंबो फार्म हाउस परिसरात शेती आणि डेअरीचे काम सुरू केले होते.  ईजा फार्म नावाच्या ब्रॅण्डखाली धोनीच्या डेअरीतील दुधाच्या उत्पादनांचीही विक्री केली जात आहे.

सोमवारपासून टोमॅटोची विक्री सुरू करण्यात आली आहे. प्रति किलो 40 रुपये दराने विकल्या जाणाऱ्य़ा टोमॅटोची पहिल्याच दिवसात मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली. धोनीने आपल्या शेतातील भाज्या व दुधाच्या मार्केंटिंगची जबाबदारी शिवनंदन यांच्यावर सोपवली आहे.

धोनीच्या फार्म हाऊसवर सध्या कडकनाथ प्रजातीच्या कोंबडीची जवळपास दोन हजार पिल्ले आहेत. त्याने काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातून ही पिल्ले मागवली होती. लवकरच या पिल्लांचीही विक्री केली जाईल, अशी माहिती धोनीचे मार्केंटींग व्यवस्थापक शिवनंदन यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या