
राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीला बसला आहे. दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या, मात्र ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी एसटीअभावी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मुलींचे वर्गात गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळाले.
राज्याच्या अनेक भागांत तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी एसटीचाच वापर करतात. मुलींना तर एसटीचा प्रवास मोफत असून मुले मासिक पासवर शाळेत ये-जा करतात, मात्र एसटी संपामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शाळा गाठणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही एसटी संपाचा फटका बसला असून एसटीअभावी रिक्षा किंवा इतर खासगी वाहनाने शिक्षकांना शाळेत येण्याची कसरत करावी लागली.
एसटी संपाचा फटका दिवाळी सुट्टीनंतर शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांनादेखील बसण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षक परिषदेने व्यक्त केली होती. त्यामुळे एसटीने ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिषदेने केली होती, मात्र तसे न झाल्याने विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर शाळेत येऊ शकलेले नाहीत, असे परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
























































