
जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीकडून गेल्या दोन वर्षांत कोणतेही वेतन घेतलेले नाही. कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने कंपनीकडून पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या अहवालानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी मुकेश अंबानी यांचा पगार शून्य होता. म्हणजेच, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करण्यासाठी त्यांनी कोणतेही वेतन आकारले नाही. याशिवाय रिलायन्सकडून कोणतेही भत्ते, सेवानिवृत्ती लाभ, कमिशन किंवा स्टॉक पर्यायांचा लाभ घेतलेला नाही.
कोरोनाच्या महामारीमुळे वेतन न घेण्याचा निर्णय त्यांनी जून 2020 मध्ये स्वेच्छेने घेतला होता. एवढेच नव्हे तर, अंबानींनी 2021-22 मध्येही वेतन घेतले नाही. 2008-09 मध्ये अंबानींनी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे वेतन 15 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित केले होते. गेल्या अकरा वर्षांपासून त्यांच्या वेतनात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच 2019-20 पर्यंत अंबानींचा पगार केवळ 15 कोटी रुपये होता.























































