
पाण्याची पातळी ओसरल्यामुळे मुळा नदीपात्राचे अवकळाग्रस्त रूप पुन्हा उघडे झाले आहे. नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या मुळा पुलाखाली नदीपात्राची झालेली भीषण अवस्था पाहायला मिळत आहे. अवैध वाळूउपशामुळे पडलेले खड्डे, ठिकठिकाणी कचऱ्याचे साचलेले ढीग आणि पाण्याची दुर्गंधी अशी भीषण अवस्था झाली आहे. यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
यंदा 1 सप्टेंबरला मुळा धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याने धरणातून मुळा नदीत पाणी सोडण्यात आले होते. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने राहुरीकरांना दुथडी भरून वाहत असलेले डोळे दीपावून टाकणारे मुळा नदीपात्र पाहाता आले. मात्र, आता नोव्हेंबर महिन्यात नदीपात्रातील पाणी ओसरल्याने वाळूच्या उपशामुळे पडलेले खड्डे तसेच मोठय़ा प्रमाणात साचलेला कचरा उघडा होऊन मुळा नदीपात्राची अवस्था ओबडधोबड असल्याचे दिसते आहे.
वाळूउपशामुळे पुलाला धोका
नगर-मनमाड महामार्गावरील मुळा नदीच्या पुलावरून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, राजस्थान या राज्यांतील मालवाहू वाहनांची तसेच शिर्डी व शिंगणापूर या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. यामळे पुलाची सुरक्षितता जपणे ही महसूल, पोलीस तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र, वाळूचा अवैध उपसा करून पुलाला धोका निर्माण करणाऱ्या तस्करांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वाळूतस्करीचे ग्रहण
चार दशकांपूर्वी मुळा नदीपात्रातील वाळू व गोड पाण्याच्या सानिध्यात तयार होणाऱ्या टरबूज व खरबुजाच्या वाडय़ा हे समीकरण ओळखले जात होते. उन्हाळा ऋतूत राहुरीच्या टरबूज व खरबुजाच्या गोड फळांची ख्याती सर्वदूर पोहोचली होती. मात्र, तत्कालीन महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुळा नदीपात्राला लागलेले वाळूतस्करीचे ग्रहण आजही कायम असल्याने नदीपात्राची अवस्था भीषण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
निरुपयोगी ‘पान्हाड’चे उदंड पीक
वाळूच्या अमर्याद उपशामुळे मुळा नदीपात्रात पडलेल्या खड्डय़ांत निरुपयोगी पान्हाड गवताचे उदंड पीक आले आहे. मांस, मच्छी व्यावसायिकांकडून नदीपात्राच्या कडेला जनावरांचे अवशेष आणून टाकले जात आहेत. या घाणीमुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने खरूज, गजकर्ण, नायटे यांसारख्या त्वचा रोगांना आयते निमंत्रण मिळत आहे.




























































