… आणि मुळ्येकाकांची बोलतीच बंद झाली! शिवाजी मंदिरात रंगला ‘माझा पुरस्कार’ सोहळा

826

मराठी नाटय़सृष्टीत सर्वत्र सुखनैव संचार करणारे नाटय़वेडे अशोक मुळ्ये (काका) म्हणजे स्पष्टवक्ते, अगदी फटकळ वाटावे इतके! ‘खरं सांगतो…‘ अशी वाक्याची सुरुवात करून धडधडीत बोचरं खरं बोलणारे मुळ्ये काका नाटय़कर्मींना एकत्र आणणारे नवनवीन उपक्रम आखत असतात. नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘माझा पुरस्कार’ देऊन ते गौरवतात. मात्र त्या गौरव समारंभातही फडफडा बोलत असतात. यावेळच्या पुरस्कार सोहळ्याला मात्र वेगळं कोंदण लाभलं. कारण त्यांनी ‘काका आम्हालाही तुमच्यासारखं स्पष्ट बोलता येतं’ या नावानंच कार्यक्रम आयोजित केला. यात अनेकांनी मुळयेकाकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याला काकांनी दिलखुलास दाद दिली.

श्रेया बुगडे, शरद पोंक्षे, भरत जाधव, लीना भागवत, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, प्रशांत दळवी यांच्यासह सिने-नाटय़ क्षेत्रातली अनेक नामवंत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. प्रसिद्ध गायकांनी यावेळी अवीट गोडीची सदाबहार गाणी सादर केली तर स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिवाजी मंदिरात पार पडलेल्या ‘मुळ्ये काका, आम्हालाही स्पष्ट बोलता येतं’ या कार्यक्रमात अभिनेते संजय मोने, नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे, ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर आणि ज्योती अंबेकर सहभागी झाले. या चौघांनी मुळ्ये काकांची थट्टामस्करी करत त्यांच्याच कार्यक्रमात हसतखेळत शालजोडी देत त्यांचे गुण-अवगुणांचे जाहीर प्रदर्शन घडवले. प्रेक्षकांनीही त्याला मनमुराद दाद दिली. मुळ्ये काकाही फार खूश झाले.

आपली प्रतिक्रिया द्या