सॅण्डहर्स्ट रोडच्या मायक्रो टनेलिंगमुळे पाणी तुंबले नाही!

मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाच्या दरम्यानही ‘मायक्रो टनेलिंग’ करण्यात आले आहे. येथे 1.8 मीटर व्यासाची आणि 415 मीटर लांबीची भूमिगत वाहिनी टाकली आहे. पालिकेने या ‘मायक्रो टनेलिंग’ साठी 16.5 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. अवघ्या चार महिन्यांत हे काम पालिका आणि मध्य रेल्वेने पूर्ण केले आहे. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही येथे पाण्याचा योग्य निचरा होऊन पाणी तुंबले नाही.

20 मार्च 2021 रोजी सॅण्डहर्स्ट रोड येथे जमिनीखाली पर्जन्यवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. अवघ्या चार महिन्यांत 20 जुलै 2021 रोजी हे किचकट काम पूर्ण करण्यात आले. पी. डिमेलो मार्गावर उच्च दाबाच्या दोन विद्युत वाहिन्या आणि तीन मुख्य जलवाहिन्यांना कोणत्याही प्रकारची क्षती न पोहोचवता पालिकेच्या मदतीने पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन रुळांवर तुंबणारे पाणी पी. डिमेलो येथे पालिकेच्या हद्दीत वाहून जाऊन समुद्राला मिळते आणि रूळ मोकळे राहतात. पालिकेने तरतूद केलेल्या या कामाची अंमलबजावणी रेल्वेने केली आहे. यापूर्वी येथे मोठा पाऊस पडल्यास पाणी तुंबायचे आणि लोकल बंद पडायच्या.

महाव्यवस्थापकांचे बक्षीस जाहीर…

अवघ्या चार महिन्यांमध्ये ‘सॅण्डहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकनजीकच्या रेल्वेमार्गाखालून पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी मुंबई डिव्हिजनला 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या नव्या पर्जन्य जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रभावीपणे निचरा होण्यास मदत मिळाली आहे. यंदा अतिवृष्टीच्या काळातही या ठिकाणी पावसाचे पाणी साचले नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या