आता ऍल्युमिनियमची ट्रेन -20 पुढच्या वर्षीपर्यंत एक डझन गाडय़ांचे टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

ट्रेन-18 ला काही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला असला तरी ही ट्रेन केवळ प्रोटोटाइप असल्याने यातील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. पुढील वर्षापर्यंत एक डझन ट्रेन-18 तयार करण्यात येणार आहेत. तसेच ट्रेन-18 ही स्टील बॉडीच्या बांधणीची असली तरी नवीन ट्रेन -20 ही ऍल्युमिनियमच्या बांधणीची बनविण्याचा विचार असून रेल्वे बोर्डाकडे त्याच्या डिझाईनबद्दल बोलणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘वंदे भारत’ अर्थात ट्रेन-18 च्या उद्घाटनाला तांत्रिक बिघाडाचे गालबोट लागले असले तरी ही ट्रेन हिंदूस्थानी इंजिनीयर्सची भेट आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार झालेल्या या ट्रेनच्या निर्मितीसाठी चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीतील (आयसीएफ) कर्मचाऱयांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2018 पर्यंत एकही सुट्टी घेतली नव्हती असे प्रतिपादन आयसीएफचे मुख्य यांत्रिक अभियंते सुभ्रांशू यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली.

हीच ट्रेन परदेशातील ट्रकवर ताशी 250 कि.मी.च्या वेगाने धावली असती असेही एका प्रश्नाला उत्तर देताना सुभ्रांशू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘ ट्रेन- 18 ही देशी तंत्रज्ञानाची कमाल आहे. ही ट्रेन तयार करण्याचे काम मे 2017 पासून सुरू झाले. ती केवळ 18 महिन्यांत तयार करण्यात आली. आमच्या कर्मचाऱयांनी ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत एकही सुट्टी घेतली नाही, 15 ऑगस्टलाही काम केले. कंत्राटदारांची माणसेदेखील शनिवार-रविवारी कामे करीत होती.’

16 डब्यांची ही ट्रेन केवळ 93 कोटींमध्ये तयार करण्यात आली आहे. मुंबईच्या वातानुकूलित लोकलच्या एका डब्याच्या निर्मितीचाच खर्च साडेपाच कोटी इतका प्रचंड आहे. ईएमयू लोकलच्या डब्यांची रुंदी 12 फुटांपर्यंत असल्याने खर्च जादा होतो, असेही त्यांनी सांगितले.

सर्व यंत्रणा डब्याच्या खाली…
या गाडीचे सर्व पार्टस् अगदी ट्रान्सफॉर्मरपासून ते ऑक्झिलरी कन्व्हर्टर आदी सर्व यंत्रणा ट्रेनच्या तळाशी बसविण्यात आले आहेत. या गाडीचा कमाल वेग दर ताशी 160 कि.मी. इतका असून चाचणी वेग 180 कि.मी.इतका आहे.

मुंबईतही ट्रेन – 18?
मुंबईमध्ये सेमी हायस्पीड मार्गावर ट्रेन -18 चालविण्यास काही हरकत नसावी, परंतु अंतिम निर्णय सरकार घेईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नव्या विना इंजिनाच्या ट्रेन-20 गाडीच्या डिझाईनबद्दल बोर्डाशी बोलणी सुरू असून तिची बांधणी ऍल्युमिनियमपासून करणार आहेत. त्यामुळे या ट्रेनच्या क्षमतेत अधिक पटीने वाढ होणार असल्याचे सुभ्रांशू यांनी सांगितले.