मुंबईतील 405 रस्ते, 29 पुलांची कामे वेगात; सोशल डिस्टन्स पाळून अहोरात्र काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा अगदी तोंडावर आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील अत्यावश्यक कामे जोरदारपणे सुरू आहेत. यामध्ये 405 रस्ते आणि 29 पुलांची कामे वेगात सुरू आहेत. यामध्ये 28 एप्रिलपर्यंत रस्त्यांची 50 कामे पूर्ण झाली असून बाकी कामे प्रगतीपथावर आहेत. लॉकडाऊन असतानाही पालिकेकडून सोशल डिस्टन्स ठेवून आणि जास्तीत जास्त यांत्रिकी पद्धतीचा वापर करून ही कामे सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रस्ते आणि पुलांची कामे ही अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे आणि मुंबईकरांना येणार्‍या पावसाळ्यात कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी रस्ते, पुलांची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. रस्त्यांची 322 आणि 29 पुलांची कामे सध्या प्रगतीपथावर असून ती लवकरात लवकर पूर्ण होतील अशी माहितीही त्यांनी दिली. रस्त्यांच्या कामांमध्ये शहरात 132, पूर्व उपनगरात 95 आणि पश्चिम उपनगरात 178 कामे सुरू आहेत. तर पुलांच्या कामांमध्ये शहरात 12, पूर्व उपनगरात 11 आणि पश्चिम उपनगरात सहा पुलांची कामे सुरू आहेत.

2221 कामगार अहोरात्र काम करताहेत
पालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1591 तर पुलांची कामांसाठी 630 कर्मचारी मिळून 2221 कामगार अहोरात्र काम करीत आहेत. पालिका अधिकार्‍यांकडून या कामांवर लक्ष-नियंत्रण ठेवण्यात येत आहे. काम करताना सोशल डिस्टन्सचा नियम पाळून आणि जास्तीत जास्त यांत्रिकी पद्धतीने काम सुरू आहे. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.