तीन हजार जण बरे होऊन घरी परतले, वांद्रे पूर्वची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!

315

संपूर्ण मुंबईत आता कोरोना नियंत्रणात येत असून पालिकेच्या एच पूर्व विभागाची कामगिरी सर्वोत्तम ठरत आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी 52 दिवस असताना वांद्रे पूर्वमध्ये मात्र डबलिंग रेट 166 दिवसांवर पोहोचला आहे. शिवाय सरासरी 0.4 टक्क्यांची रुग्णवाढही मुंबईत 24 वॉर्डच्या तुलनेत सर्वात कमी आहे. या विभागात 2 हजार 910 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे वांद्रे पूर्व विभागाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे.

मुंबईत 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर दाटीवाटीचा भाग असलेल्या एच पूर्व वॉर्डमधील वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्वमध्येही कोरोना झपाटय़ाने पसरला. ‘एच’ पूर्वची एकूण रुग्णसंख्या 3743 झाली असली तरी यातील सुमारे तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चेस द व्हायरस’ मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणारा शोध आणि रुग्णामागे 15 जणांना प्रभावी क्वारंटाइन, प्रभावी औषधोपचार, निर्जंतुकीकरण मोहीम यामुळेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आता या ठिकाणी फक्त 514 ऍक्टिव्ह रुग्ण असून यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

आदित्य ठाकरेंकडून खैरनार कुटुंबीयांचे सांत्वन
z वांद्रेमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱया ‘कोविड योद्धय़ा’चा मृत्यू झाल्याने पालिकेसह मुंबईचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, खैरनार कुटुंबीयांची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुलुंड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. सरकार आणि पालिका प्रशासन खैरनार कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी राहील असा धीरही त्यांनी यावेळी दिला. यावेळी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, माजी महापौर नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या