मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर अरबी समुद्रातून तब्बल 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. समुद्राखालून जाणारा हा देशातील पहिला इतक्या मोठय़ा लांबीचा बोगदा असणार असून त्यातून तब्बल ताशी 320 कि.मी.च्या स्पीडने बुलेट ट्रेन धावणार आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) यांचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान परदेशात वापरले जाते.
वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान हा बोगदा तयार करण्यात येणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन या 508 कि.मी. लांबीच्या कॉरीडॉरचे काम करत आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील समुद्राखालचा पहिलाच बोगदा असणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल. या बोगद्याचे खोदकाम तीन राक्षसी मशीनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
असे होणार बोगद्याचे काम
– घणसोली, शिळफाटा आणि विक्रोळी या भागात मशिनरीद्वारे काम सुरू करण्यासाठी खोदकाम केले जातेय. वर्षाअखेरीपर्यंत पहिल्या टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
– समुद्राखालून तयार करण्यात येणाऱया या बोगद्यातील 7 किमीच्या खोदकामात अनेक अडचणी येऊ शकतात. हा बोगदा सिंगल टय़ूब बोगदा असेल. त्यात बुलेट ट्रेनला येण्यासाठी आणि जाण्यासाठी असे दोन ट्रक असतील.
– बीकेसी ते शिळफाटय़ापर्यंत बोगद्याचे काम होणार आहे. ठाणे खाडी दरम्यान समुद्रातून 7 कि.मी. लांबीचा बोगदा तयार करण्यात येईल.
– 16 किमीच्या मार्गात खोदकाम करण्यासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाईल.