
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पडत असलेल्या पावसामुळे धुरके विरले असून मुंबईची हवा सुधारली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी हवा समाधानकारक असल्याचे निरीक्षण ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱया हवामान विभागाच्या संस्थेने नोंदवले आहे. मात्र दिवाळीत फटाके मोठय़ा प्रमाणावर वाजवल्यास मुंबईवर पुन्हा धुरके पसरण्याची भीती असल्याचे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
मुंबईत मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे तसेच मेट्रोसह विविध प्रकल्पांमुळे मुंबईत मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हजारो लिटर पाणी वाया घालवण्याचा चंगच बांधला आहे. मुंबईत धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी विविध क्लृप्त्या पालिका योजत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील चेकनाक्यांवरून जाणाऱया वाहनांवर पाणी फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हाय जेट प्रेशर मशीन बसवण्यात येणार आहे. मात्र फटाक्यांमुळे होणाऱया प्रदूषणावर पालिका काय उपाययोजना करणार, असा सवाल आता तज्ञ विचारत आहेत.
ठिकाण गुणवत्ता (एक्यूआय) हवा
कुलाबा 49 चांगली
माझगाव 79 समाधानकारक
वरळी 47 चांगली
अंधेरी 66 समाधानकारक
भांडूप 63 समाधानकारक
बोरिवली 92 समाधानकारक
मालाड 86 समाधानकारक
नवी मुंबई 89 समाधानकारक
हवा बिघडणार नाही; हवामान विभागाचा दावा
पाऊस पडल्यामुळे धूळ खाली बसली आणि मुंबईतील प्रदूषण कमी झाल्याचे मुंबईच्या हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले. तसेच मुंबईत पूर्वेकडून वाहणाऱया वाऱयामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. दिवाळीत फटाके जरी मोठय़ा प्रमाणावर वाजले तरी पूर्वेकडून वाहणाऱया वाऱयांमुळे प्रदूषण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


























































