
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यानुसार हिमाचल हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेसह इतर याचिकांची दखल घेत हायकोर्टाने याप्रकरणी स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर गेल्या आठवडय़ात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. मुंबई नवी मुंबईतील वायू प्रदूषण अद्याप कमी होत नसल्याने खंडपीठाने चिंता व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. तसेच प्रशासनाला फटकारले.
समितीच्या शिफारसींमध्ये मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी तातडीच्या, मध्यम-मुदतीच्या आणि दीर्घकालीन उपायांचा समावेश असावा, तसेच मुंबई आणि नवी मुंबईसाठी श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखडा तयार करण्याबाबत समितीने त्यांना सल्ला द्यावा.
समिती 5 मार्चपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करू शकते, त्यानंतर समितीने मासिक अहवाल सादर करावा प्रदूषण कमी करण्यासाठी, प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त उपाययोजना समिती सुचवू शकते.




























































